जळगाव : अमृत योजना तसेच भुयारी गटारीचे अर्धवट काम करून सोडून दिल्यामुळे प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांचे खराब रस्ते, खड्डे तसेच धुळीमुळे अतोनात हाल होत आहे. त्यासंदर्भात नागरिकांनी शनिवारी सकाळी अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना समस्या मांडण्यासाठी बोलविले असता, त्यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त करीत अक्षरक्ष: अमृतच्या अधिकाऱ्यांची आरती करीत शिव्यांची लाखोली वाहिली.
शहरातील प्रभाग समिती १६ मधील लक्ष्मीनगर, सम्राट कॉलनी, देवीदास कॉलनी आदी भागांमध्ये गेल्या एक ते दीड वर्षांपासून अमृत योजनेचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्यावर जागोजागी खड्डे करण्यात आली होती़ त्यातच भुयारी गटारींची कामे या भागात हाती घेण्यात आली. परिणामी, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही दिवसानंतर या खड्ड्यांची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली. मात्र, पुन्हा रस्त्यावर खड्डे पडले. त्यामुळे वर्षभरापासून या भागातील नागरिक खड्डे, खराब रस्ते तसेच धुळीमुळे हैराण होते. आता पावसामुळे जागोजागी चिखल झाल्यामुळे समस्यांमध्ये भर पडली आहे. चालणेसुध्दा कठीण झाले असून वाहने घसरून अपघात होत आहे. एवढेच नव्हे तर खड्ड्यांमध्ये पडून रहिवासी जखमी होत आहेत. याबाबत वारंवार तक्रार केल्यानंतरही दुर्लक्ष होत असल्यामुळे अखेर प्रभाग समिती १६ मधील रहिवाशांनी शनिवारी सकाळी ९ वाजता संबंधित नगरसेवक व अमृतच्या अधिकाऱ्यांना समस्या मांडण्यासाठी बोलवून घेतले. त्यानंतर संतप्त रहिवाशांनी संपूर्ण समस्या मांडल्यानंतर अमृत योजनेच्या निकृष्ट दर्जाचे काम केले म्हणून चार अधिकाऱ्यांची चक्क आरती केली व नाराजी व्यक्त केली.
शिव्यांची लाखोली वाहिली
खराब कामांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे रहिवाशांनी नगरसेवक तसेच संबंधित अधिकाऱ्यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली. तसेच नगसेवक वॉर्डातील कामे पूर्ण करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत नसल्याचा आरोप रहिवाशानी केला. त्यानंतर तात्काळ रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
पाऊस झाला की रस्त्यावरून पायी चालणे सुध्दा कठीण झाले आहे़ अनेक जण खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाल्याच्याही घटना घडत आहेत. धुळ, खड्डे आणि चिखलाच्या समस्यांनी त्रस्त होऊन रहिवाशांनी अधिकाऱ्यांची आरती केली व तात्काळ रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी केली. प्रभाग समिती १६ मधील कामांकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
- स्वप्निल जगताप, रहिवासी
अमृतच्या कामांमुळे जागोजागी खड्डे झाले आहेत. थातूर-मातूर दुरूस्ती केली असल्यामुळे आता पुन्हा ते खड्डे जैसे थे झाले आहेत. एक वर्षापासून विविध समस्यांना रहिवाश्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आता तरी लक्ष देवून समस्या सोडविण्यात याव्यात.
- गणेश सपके, रहिवासी