लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एकीकडे नागरिक उकाड्याने त्रस्त असताना दुसरीकडे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा त्रास अधिक वाढला आहे. दुरुस्तीच्या नावाखाली महावितरणकडून दररोज आठ-आठ तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. विशेष म्हणजे एक दिवस दुरुस्तीचे कारण दिले जाते, मात्र इतर दिवस कोणतेही दुरुस्तीचे काम नसतानाही महावितरणकडून अघोषित भारनियमन केले जात आहे. यामुळे जळगाव ग्रामीणमधील नागरिक वैतागले आहेत. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
महावितरणकडून मान्सूनच्या आधीच दुरुस्तीची कामे केली जात असतात. या कामांच्या वेळेस काही दिवसांसाठी महावितरणकडून भारनियमन केले जात असते; मात्र आता मान्सून सुरु झाल्यावरदेखील दररोज वीजपुरवठा खंडित केला जात आहे. विशेष म्हणजे आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, कानळदा, नांदगाव, कुवारखेडा या गावांमध्ये नेहमीच वीजपुरवठा खंडित केला जात आहे. तर शिरसोलीसह वडली, वावडदा भागात देखील दिवसभरात अनेकवेळा विजेचा लपंडाव हा सुरुच असतो. आव्हाणे, खेडी, वडनगरी या गावांमध्ये तर गेल्या काही दिवसांपासून सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद केला जात असल्याचे आढळून आले आहे.
कोणतेही वादळ, पाऊस नसतानाही वीजपुरवठा खंडित का ?
सध्या महावितरणची यंत्रणा कुचकामी ठरत आहे. कोणतेही वादळ किंवा जोरदार पाऊस नसतानाही काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. तसेच नियमित वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही रात्रभर विजेचा लपंडाव हा सुरुच असतो. याबाबत नागरिकांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला जातो तरीही महावितरणकडून ग्राहकांना अपेक्षित उत्तर दिले जात नसल्याचेही पाहायला मिळत आहे. यासह शेतीसाठी दिला जाणारा आठ तास पुरवठा देखील नियमित होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
कोट..
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. कोणतेही वादळ, पाऊस नसताना दिवसभर वीजपुरवठा खंडित ठेवला जात आहे. तसेच रात्री देखील अनेकवेळा वीज ये-जा करत असते.
- जितेंद्र चौधरी, आव्हाणे
शहरापासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या गावामध्ये एखाद्या आदिवासी पाड्याप्रमाणे वीजपुरवठा केला जातो. दिवसभरात ८ ते ९ तास वीजपुरवठा केला जात आहे. महावितरणचे अधिकारी दुरुस्तीचे कारण सांगतात.
- स्वप्नील जाधव, फुपनगरी,