जळगाव - राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना आपत्तीजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने त्यांची तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या निवाऱ्यांच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. शासन आणि प्रशासनाकडून नागरिकांच्या मुलभूत गरजांची पुर्तता होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जळगाव जिल्ह्यातील सहकार विभागाकडून या आसमानी संकटाचा सामना करण्यासाठी आपला सुध्दा किमान खारीचा वाटा असावा. यासाठी सांगली जिल्ह्यातील पलूस, सुखवाडी व विठ्ठलवाडी या तीन गावांना महापुराचा अधिक फटका बसला आहे. तेथील कुटुंबे अधिक बाधीत झालेली आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आधार व्हावा, म्हणून त्या गावांतील 371 कुटुंबांना किमान एक महिना पुरेल एवढे किराणा सामान व सोबतच 21 जीवनावश्यक वस्तुंचे एक किट याप्रमाणे 371 किट तयार करून आज 15 ऑगस्ट, 2019 रोजी एका विशेष ट्रकद्वारे रवाना केले. या वाहनाला जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था मेधराज राठोड व जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे.
याप्रसंगी जिल्हा उप निबंधक कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मदत कार्यात सहकार विभागाचे एम. आर. शहा, अरूण खैरे, भाऊसाहेब महाले, एम.बी.गाढे, वाहेद तडवी, धिरज पाटील, शशीकांत साळवे, महेंद्र देवरे, भालचंद्र देशपांडे आदि अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे.