जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउनच्या काळात कोणीही उपाशी पोटी राहू नये यासाठी मोफत तांदूळ देण्याची घोषणा झाली असली तरी यासाठी नागरिकांना मोठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिधा पत्रिकाधारकांनी गुरुवारी सकाळी तहसील कार्यालय गाठले मात्र तेथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. विशेष म्हणजे हक्काचे धान्य मिळविण्यासाठी आवश्यक असणारा शिक्का मारण्यासाठी पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउनमुळे उद्योग, व्यवसाय, दुकाने बंद असल्याने कोणीही उपाशी राहू नये, यासाठी केंद्र सरकारने तीन महिने मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, अनेक रेशन दुकानदारांकडून कार्डवर शिक्का नसल्याचे सांगून धान्य देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच धान्य आले नाही, माल शिल्लक नाही, असे वेगवेगळे उत्तरे देऊन स्वस्त धान्य दुकानारांकडून ग्राहकांना परतावून लावले जात आहे.हे प्रकार वाढतच असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी तहसील कार्यालय गाठले. यावेळी शिक्का मारण्याची विनंती पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी धुडकावून लावली. यावेळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.शिक्का मारण्यासाठी या ठिकाणी दोन हजार रुपये मागण्यात येत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.धान्य हवे असले तर शिधा पत्रिकेवर शिक्का मारून आणा, असे सांगत रेशन दुकानदार लाभार्थ्यांना माघारी पाठवत आहे तर दुसरीकडे नागरिक शिक्का मारण्यासाठी तहसील कार्यालयात गेले असता त्यांना रेशन कार्डवर शिक्का लागत नसल्याचे सांगण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे.
जळगावात धान्यासाठी नागरिकांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 9:27 PM