जळगाव : कोरोनाचा आलेख घसरला असून शहरात गुरुवारी ५ नवे बाधित आढळून आले असून २६ रुग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यात चाळीसगाव वगळता अन्य सर्व तालुक्यांची सक्रिय रुग्णसंख्या ही ३०० च्या खाली असून यात धरणगावात सर्वात कमी ३८ रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, गुरुवारी शहरात एकही मृत्यू नसल्याने दिलासादायक वातावरण कायम होते.
शहरात चाचण्यांची संख्या ही स्थिर असली तरी बाधितांचे प्रमाण हे अगदीच एक ते दोन टक्क्यांवर आले आहेत. रुग्णसंख्या घटतच असून गुरुवारी प्रथमच जिल्ह्याची रुग्णसंख्या ही शंभराच्या आत नोंदविण्यात आली आहे. गुरुवारी ॲंटिजनपेक्षा आरटीपीसीआर चाचण्या अधिक झाल्या. आरटीपीसीआरचे २,५६० अहवाल पाठविण्यात आलेत. तर ३,०१५ अहवाल समोर आले. यात ४५ तर २२४१ ॲंटिजन चाचण्यांमध्ये ३५ बाधित आढळून आले आहेत. जिल्हाभरातील सक्रिय रुग्णांची संख्या ही २,२८८ वर पोहोचली आहे.