लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - कोरोनाकाळात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे इतर कचऱ्याच्या प्रमाणात घट झाली असली तरी या काळात शहरात मोठ्या प्रमाणात जैविक कचरा झाला. नेहमी हा कचरा वर्षाला ७० ते ९० टन इतका जमा होत होता. मात्र, कोरोनाच्या काळात शहरात एकूण ३०० टन कचरा जमा झाल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत रुग्णांवर उपचारांसाठी पीपीई किट्स, मास्क, गॉगल आणि इतर वस्तूंचा वापर दररोज केला जातो. या गोष्टींच्या संपर्कात आल्यानेही आजाराचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे एकदा वापरल्यानंतर या वस्तूंची योग्य विल्हेवाट लावावी लागते. त्यामुळे, कोरोनाच्या संकटात शहरात निर्माण होणाऱ्या जैविक वैद्यकीय कचऱ्याच्या संख्येत हजारो किलोंनी वाढ झाल्याच पाहायला मिळतय, मार्चमध्ये राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मोठ्या प्रमाणात जैविक कचरा निर्माण होण्यास सुरूवात झाली. कोरोनानंतर शहरात निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. मार्च ते जून पर्यंत रुग्णांची संख्या कमी होती. त्यामुळे सुरुवातीला जैविक कचऱ्याचे प्रमाण वाढले नव्हते. मात्र, जुलै ते सप्टेंबर महिन्यात रुग्णाच्या वाढीसोबतच जैविक कचऱ्यात देखील वाढ झाली आहे.
चार वर्षांचा कचरा ९ महिन्यात
शहरात सर्वसाधारणपणे वर्षाला ७० ते ९० टन कचरा जमा होत असतो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून सुरु झाल्यानंतर डिसेंबरपर्यंत शहरात तब्बल ३०० टन कचरा जमा झाला आहे. चार वर्षात जमा होणारा कचरा या ९ महिन्याचा काळातच जमा झाला आहे. रुग्णवाढीसोबतच हा कचरा देखील वाढला असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येते.
जैविक कचरा फेकणाऱ्यांना दंड
मनपा प्रशासनाने शहरात जैविक कचरा जमा करण्यासाठी माॅन्साई कंपनीला मक्ता दिला आहे. कोरोनाच्या काळात अनेक ठिकाणी उघड्यावर पीपीई कीट फेकले जात होते. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात देखील अनेक ठिकाणी हे कीट फेकण्यात आले. यामुळे काही कर्मचाऱ्यांना दंड देखील करण्यात आले. यासह स्मशानभूमी परिसरात देखील मृतदेहावरील पीपीई कीट फेकणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना देखील मनपा प्रशासनाने दंड ठोठावला होता.
कोट..
कोरोनाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात जैविक कचरा निर्माण झाला. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मनपाकडून स्वतंत्र मक्ता देण्यात आला आहे. उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोविडमुळे निर्माण होणाऱ्या जैविक कचरा जमा करण्यासाठी वेगळी जबाबदारी देण्यात आली होती.
-पवन पाटील, आरोग्य अधिकारी
कोरोनाआधी वर्षाला जमा होणारा कचरा
९० टन
कोरोनाच्या काळातील ९ महिन्यात जमा झालेला कचरा
३०० टन
महिनानिहाय जमा झालेला कचरा (टन नुसार)
मार्च - ०४
एप्रिल - ११
मे - १७
जून - २७
जुलै - ३३
ऑगस्ट - ४०
सप्टेंबर - ५१
ऑक्टोबर - ४८
नोव्हेंबर - ३९
डिसेंबर - ३०