अवघ्या १२ कि.मी. अंतरावर घोंघावणाऱ्या संकटापासून जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरजरावेर, जि.जळगाव : तालुक्याच्या चोरवड मध्य प्रदेश सीमेपासून अवघ्या १२ कि. मी. अंतरावर असलेल्या बर्हाणपूर शहरात दाऊदपुरा भागातील माजी नगरसेवकाच्या परिवारासह त्याच्या संपर्कातील १८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बर्हाणपूर शहरासह आपल्या सीमावर्ती भागात कमालीची खळबळ उडाली आहे. तालुक्यातून दुग्ध व्यावसायिक दूध संकलन करून बर्हाणपूर शहरात डेअरी व्यावसायिकांना पुरवठा करत असल्याने तथा बर्हाणपूर शहरातून फळभाज्या रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात आयात होत असल्याने तथा सीमा तपासणी नाक्याखेरीज शेती शिवारातील चोरट्या रस्त्याने म. प्र. तून येणाऱ्यांची वर्दळ सुरू असल्याने १२ कि. मी. अंतरावर घोंघावत असलेले संकट कोणत्याही क्षणी रावेर तालूक्यात १२ वाजवण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.बर्हाणपूर शहरातील एका खासगी रुग्णालयात मलकापूर येथील वृध्देने कोरोनाचा शिरकाव केल्यानंतर, दाऊदपुरा भागातील एका माजी नगरसेवकाला कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. त्यानंतर त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करून त्याचे नमुने इंदूर येथे रवाना करण्यात आले होते. त्याचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची भनक लागताच त्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातून पळ काढून शहरातील दोन तीन खासगी रुग्णालयात तपासणीसाठी प्रयत्न केले. मात्र त्यास खासगी रुग्णालयात तपासणीसाठी ठेंगा दाखवण्यात आल्याने त्याचा सहकारी व त्यास त्याचा मुलगा व चालकाने इंदूरला नेवून कोरोना रूग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले. जिल्हा प्रशासनाची पूर्व परवानगी न घेताच नाकाबंदीचे उल्लंघन करून माजी नगरसेवक पुत्र परत आल्याने कोरोना बाधित माजी नगरसेवक, त्याचा साथीदार, चालक व मुलाविरूध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये बर्हाणपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, संबंधित माजी नगरसेवकाने खासगी रुग्णालयात जावून वैद्यकीय तपासणीपूर्वी ज्या ज्या व्यक्तींशी संपर्क साधला त्यांना व त्याच्या संपर्कात आलेल्या परिवारातील व्यक्ती असे ५३ जणांना संस्थात्मक विलगीकरण करून त्यांचे स्वॅबचे नमुने कोरोनाच्या वैद्यकीय चाचणीसाठी इंदूरला पाठवण्यात आले होते. त्यातील १८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाला असून जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्यास दुजोरा दिला आहे.त्यात बर्हाणपूर शहरातील मोमीनपुरा, दाऊदपुरा, बसस्टॅण्ड परिसर, वॉर्ड क्रमांक २७, लोधीपुरा, आझादनगर या भागातील कोरोनाची बाधा झालेली रूग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवाशांचे बर्हाणपूर शहरासह जिल्ह्य़ातील रहिवाशांचे नातेवाईक आहेत. अवघ्या १२ कि मी अंतरावरील बर्हाणपूर शहरात कोरोनाचे संकट घोंघावत असल्याने जिल्हा महसूल व पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची सक्त गरज असल्याचे मत जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे.रावेर तालूक्यातून दूध संकलन करून बर्हाणपूर शहरात पुरवठा केला जातो तथा बर्हाणपूर येथील लिलाव बाजारातून भाजीपाला व फळभाज्यांचा पुरवठा रावेर तालुक्यात होत असल्याने खबरदारीची उपाययोजना करून राज्य महामार्गासह चोरट्या मार्गावरही करडी नजर ठेवून सील करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
बऱ्हाणपूर शहरात कोरोना बाधित १८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 9:21 PM