लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीची मागणी अधिक आणि पुरवठा अगदीच तुरळक होत असल्याने लसीकरणाची यंत्रणा वारंवार ठप्प होत आहे. यात शनिवारी लसच उपलब्ध नसल्याने शहरातील सर्वच शासकीय लसीकरण केंद्रं बंद हेाती. यात काही खासगी केंद्रांवरही लस मिळत नव्हती. सोमवारपासून लसीकरण सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यात आता ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. यानंतर १ मे नंतर १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे केंद्रांवर गर्दी उसळण्याची शिवाय लसीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण ६० वर्षांवरील अनेक नागरिकांचा लसीचा दुसरा डोस अद्याप बाकी आहे तर ४५ वर्षांवरील नागरिकांचा दुसरा व १८ वर्षांवरील सर्वांचा पहिला डोस असे एकत्रित लसीकरण या कालावधीत सुरू ठेवावे लागणार आहे. त्यामुळे लसींचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय यात कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड असे दोनही डोस कमी, अधिक प्रमाणात उपलब्ध होत आहेत; मात्र ज्याने पहिला डोस कोविशिल्ड घेतला त्याला दुसरा डोस कोविशिल्डच घ्यायचा असल्याने तो जेव्हा उपलब्ध होईल, तेव्हा दुसरा डोस घेता येणार आहे. कोव्हॅक्सिन व कोविशल्ड या देानही लसींचे सम प्रमाणात डोसेस न येता कमी अधिक प्रमाणात प्राप्त होत आहेत.
शहरातील लसीकरण केंद्र
रेडक्रॅास रक्तपेढी, मनपा शाहू महाराज रुग्णालय, चेतनदास मेहता रुग्णालय, नानीबाई रुग्णालय, डी. बी. जैन रुग्णालय, रोटरी भवन या ठिकाणी शासकीय लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यासह काही खासगी केंद्रांवरही तपास केला असता, मंगळवारी लसीकरण सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
लसीचा मोठा साठा आवश्यक
एकूण लोकसंख्येच्या ३५ टक्के लोकसंख्या ही १८ ते ४५ वयोगटातील असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. आताची जिल्ह्याची अंदाजीत लोकसंख्या ही ४७ लाख ग्राह्य धरल्यास १६ लाखांवर ही लोकसंख्या डोससाठी साधारण ३० ते ३२ लाख डोसेसची जिल्ह्याला गरज पडणार आहे. त्यामुळे पहिल्या डोससाठी पुरेसा साठा आल्यास ही यंत्रणा सुरळीत राहू शकते, असे सांगण्यात येत आहे.