प्रशांत भदाणे -
जळगाव - शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या सत्तेत सहभागी आहेत. जळगाव जिल्ह्यात स्थानिक पातळीवर मात्र, या दोन्ही पक्षांमध्ये कमालीचे वैर पाहायला मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत मोठी धुसफूस सुरू आहे. या ना त्या कारणावरून दोन्ही पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसताहेत. चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना आमदार लता सोनवणे यांची आमदारकी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीश वळवी यांच्यामुळं धोक्यात आली आहे. आमदार सोनवणे यांच्या टोकरे कोळी जातीच्या प्रमाणपत्राबाबत जगदीश वळवींनी नंदुरबारच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे तक्रार केली होती. यामुळे आमदार सोनवणेंचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले गेले. या निकालाविरुद्ध आमदार सोनवणे आता उच्च न्यायालयात जाणार आहेत.
चोपड्यात सेना-राष्ट्रवादीत पूर्वीपासूनच हाडवैर-चोपडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आतापर्यंत एकमेकांचे कट्टर शत्रू राहिले आहेत. 2009 मध्ये जगदीश वळवींनी शिवसेनेचे डी. पी. साळुंखे यांचा पराभव केला होता. यानंतर 2014 मध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचा वचपा काढला. तेव्हा शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत सोनवणेंनी राष्ट्रवादीच्या माधुरी पाटलांचा पराभव केला होता. त्यावेळी जगदीश वळवी हे भाजपकडून रिंगणात होते. त्यांनाही शिवसेनेविरुद्ध करिष्मा करता आला नव्हता. 2019 मध्ये जगदीश वळवींनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करत शिवसेनेविरुद्ध आपले नशीब आजमावले. पण तेव्हाही शिवसेनेच्या लता सोनवणेंनी त्यांचा पराभव केला होता. हा पराभव जिव्हारी लागल्यानं जगदीश वळवींनी आमदार लता सोनवणेंच्या जात प्रमाणपत्राची तक्रार केली होती. त्यामुळं लता सोनवणेंची आमदारकी धोक्यात आलीये.
मुक्ताईनगरातही आहे दोन्ही पक्षांमध्ये विस्तव-शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये असलेला हा वाद फक्त चोपडा तालुक्यापुरता मर्यादित नाही. तिकडे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातही अशीच धुसफूस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांमध्ये विस्तव धगधगता आहे. बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या काळात तर दोन्ही पक्षांमधला वाद राज्यस्तरापर्यंत गेला होता.
एकीकडे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचा आरोप होतोय, अशा परिस्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेली धुसफूस ठाकरे सरकारला परवडणारी नाही, हे वेगळं सांगायला नको.