रात्री तणाव : कारागृहाच्या मागेही दगडफेक
जळगाव : सुप्रीम काॅलनीत बुधवारी रात्री काही तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यानंतर जखमींना रात्री ११.४० वाजता जिल्हा रुग्णालयात आणले असता तेथेही पुन्हा त्यांच्यात वाद सुरू झाले. यावेळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. दुसरीकडे कारागृहाच्या पाठीमागे मद्यप्राशन करणाऱ्या तरुणांना हटकल्याने त्याचा राग येऊन मद्यपींनी रहिवाशांवर दगडफेक केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कॉलनीत बुधवारी जुन्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. या हाणामारीत काही तरुण जखमी झाल्याने ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आले होते. यावेळी दोन्ही गटातील आणखी काही तरुण रुग्णालयात आले. समोरा-समोर आल्यानंतर हे दोन्ही गट पुन्हा एकमेकांस भिडले. यावेळी काही तरुणांनी हातात शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटांकडून होत असलेल्या गोंधळ, दहशतीमुळे रुग्णालयाच्या आवारात असलेले नागरिक भयभीत झाले होते. या परिसरात पळापळदेखील झाली. या घटनेमुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर दोन्ही गटातील जखमी तरुणांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही.
मद्यपींकडून दगडफेक
जिल्ह्यात कडक निर्बंध सुरू असल्यामुळे बीयर बार, वाईन शॉप बंद आहेत. त्यामुळे मद्यपी सार्वजनिक जागांवर मद्यपान करीत आहेत. गुरुवारी दुपारी काही तरुण जिल्हा कारागृहाच्या मागील विवेकानंदनगर येथे मद्यपान करीत होते. स्थानिक नागरिकांनी या तरुणांना हटकले असता त्यांनी थेट नागरिकांच्या दिशेने दगडफेक केली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. काही जणांच्या घरातील खिडक्या तुटल्या जिल्हापेठ पोलिसांनी धाव घेतल्यामुळे मद्यपींनी तिथून धूम ठोकली.