ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.1 - क्रेडाई व अरिहंत डेव्हलपर्सतर्फे सुकृती रेसिडेन्सीमधील 43 फ्लॅटधारकांना ओला व सुका कचरा स्वतंत्र गोळा करण्यासाठी प्रत्येकी दोन डस्टबीनचे वाटप करून स्वच्छ भारत अभियानाचा शुक्रवार, 30 जून रोजी सकाळी 10 वाजता शुभारंभ करण्यात आला.
या वेळी महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, मनपा आयुक्त जीवन सोनवणे व स्वच्छतादूत भरत अमळकर,अरिहंत डेव्हलपर्सचे संस्थापक छबीलभाई शहा, क्रेडाईचे अध्यक्ष प्रवीण खडके, सचिव ललित भोळे, क्रेडाई महाराष्ट्र सुकाणू समितीचे सदस्य अनिश शहा, नगरसेवक संदेश भोईटे, अमर जैन, तसेच क्रेडाईचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत केरकचरा घरातच गोळा करण्यात येणार आहे. त्यासाठी क्रेडाईतर्फे सुकृती रेसिडेन्सीमधील 43 फ्लॅटधारकांना प्रत्येकी दोन निळ्या व हिरव्या रंगाचे दोन डस्टबीन देण्यात आले.
तसेच दोन मोठे कंटेनर असे 6 कंटेनर या रेसिडेन्सीमध्ये ठेवण्यात आले आहेत. ओला व सुका दोन्ही प्रकारचा कचरा वेगवेगळ्या डस्टबीनमध्ये जमा करण्यात येईल व तो दररोज महापालिकेतर्फे फ्लॅटधारकांकडून गोळा करण्यात येणार आहे.
ओला व सुका कचरा स्वतंत्र गोळा केल्यावर सुका कचरा मनपाच्या घंटागाडीत जमा केला जाईल. तर ओल्या कच:यावर सोसायटीच्या आवारातच कंपोस्टिंगची प्रक्रिया केली जाईल.