विवरे, ता. रावेर : विवरे खुर्द ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सोई व विकासासाठी एक पाऊल पुढे जाऊन ‘ग्रामपंचायत विवरे खुर्द : स्वच्छ, गाव सुंदर गाव’ ऑनलाइन ॲप्लिकेशन कार्यान्वित केले. या ॲप्लिकेशनचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना प्रल्हाद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या ॲपचे वैशिष्ट्य असे...
गावातील सर्व माहिती अपलोड करण्यात आली आहे. उदा. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांची नावे, फोन क्रमांक तसेच सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, त्यांचे पद, ज्यात ग्रामविकास अधिकारी, तलाठी, पोलीसपाटील, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडीसेविका, आशावर्कर, मदतनीस, पशुवैद्यकीय अधिकारी अशा सर्व गावात सेवा बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नाव, पद तसेच फोन नंबर देण्यात आले आहेत.
ज्यामुळे एका क्लिकवर आपणास आवश्यक असलेल्या व्यक्तीशी आपण संपर्क करून आपली माहिती देवाण-घेवाण करू शकता. तसेच गावात काही समस्या असतील. जसे नळाला पाणी येत नसेल किंवा पाइप लिकेज असेल तसेच गढूळ पाणीपुरवठा होत असेल तर त्यावर आपण तो वॉर्ड क्रमांक तसेच नाव टाकून तुमचा अर्ज नोंदवू शकता याचा फायदा असा की लगेच तो मेसेज ग्रामपंचायतीला मिळेल आणि लगेच त्याची दखल या माध्यमातून घेतली जाईल.
यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच सध्या कोरोना या महामारीमुळे सर्व जण हैराण झाले आहेत. त्यासाठी कोव्हॅक्सिन घेण्यासाठी वृद्धांना लाइन लावण्याची गरज नाही. या ॲपवर नोंदणी करताना त्यामध्ये आपले नाव, आधार नंबर तसेच मोबाइल क्रमांक आणि वेळ हे तुम्हाला नमूद करून द्यावा लागेल. त्यामुळे नमूद वेळेवरच आपल्याला त्या ठिकाणी बोलवले जाईल. यासह विविध अशी माहिती या ॲपमध्ये देण्यात आली आहे.
या ॲपमध्ये नवीन फीचरही देण्यात आले. या ॲपबाबत रंजना पाटील यांनी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचे कौतुक केले. तसेच हे ॲप कार्यन्वित करणारी ही जिल्ह्यात पहिलीच ग्रामपंचायत असावी, असे सांगण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, प्रल्हाद पाटील, सरपंच स्वरा पाटील. वासुदेव नरवाडे, ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, पंचायत समिती सदस्या योगीता वानखेडे, सुभाष पाटील, राजेंद्र पाटील, विवरे बु. सरपंच इनुस तडवी, दीपक गाढे, नीलेश बखाल आदी उपस्थित होते.
ॲपचे उद्घाटन करताना रंजना पाटील. सोबत स्वरा पाटील, योगीता वानखेडे. प्रल्हाद पाटील. (सरदार पिंजारी)