लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरात ७५ उपनाले तसेच ५ मुख्य नाले असून या नाल्यांची स्वच्छता मोहिम दरवर्षी पावसाळ्यापूर्वी राबविली जाते. महापालिका आरोग्य विभागाकडून सोमवारपासून छोट्या नाल्यांच्या साफसफाईला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी पवन पाटील यांनी ‘लोकमत’ ला दिली.
पावासाळ्यापूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ७५ छोट्या नाले सफाईला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. महापौर जयश्री महाजन यांनीदेखील याबाबत मनपा आरोग्य विभागाला मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करण्याबाबत गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत सूचना दिल्या होत्या.
मुख्य नाले सफाई मक्तेदाराच्या माध्यमातून
शहरातील पाच मुख्य नाले असून त्यांची लांबी २३. २ कि. मी. आहे. त्यांची सफाई ही मक्तेदारांच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविल्या असून त्या अंतिम टप्यात आहे. नाल्यांची सफाई ही जेसीबीच्या माध्यमातून केले जाणार आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती अधिकाऱ्यांकडून शहरातील मुख्य नाल्यांचा सफाईसाठीचे अंदाज पत्रक महापालिका आरोग्य विभागाकडे सादर केले असून लवकरच याबाबत देखील निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन खाजगी ठेकेदाराला काम देण्यात येणार आहे.
शहरात मागील काही वर्षात दोन ते तीन वेळा अतिवृष्टी झाली. लेंडी नाल्याच्या पूरामुळे तर ममुराबाद रस्ता दिवसभर बंद राहीला होता. गेल्या पावसाळ्याच्या वेळेस शाहू नगरातील व मेहरुण परिसारात तुंबलेल्या गटारींचे पाणी ओव्हर फ्लो होवून काही घरांमध्ये घुसले होते. त्यामुळे यंदा त्याकडे गांभीयांने लक्ष देण्यात येत आहे.
नाल्यावरील अतिक्रमणावर कारवाई नाहीच
शहरातील अनेक मुख्य नाल्यांलगत अतिक्रमण वाढले आहे. अनेकांनी नाल्याचा काठावर झोपड्या तयार केल्या आहेत. २०१४ व २०१६ मध्ये पावसाळ्यात नाल्याला पूर आल्याने अनेक घरांमध्ये पाणी साचले होते. यामुळे मनपा आयुक्तांनी नाल्याचा काठावरील अतिक्रमण काढण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्यापही कोणत्याही अतिक्रमणावर कारवाई मनपाकडून करण्यात आलेली नाही. दरवर्षी महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमण निर्मूलन विभागाला हे अतिक्रमण करण्याबाबत आदेश दिले जातात मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे अनेक वर्षांपासून नाल्या लगतचे अतिक्रमण काढण्यात आलेले नाहीत.