मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी स्वत : अतिक्रमण पथकासोबत रस्त्यावरुन उतरुन ही कारवाई केली. दुपारी बारा पासून बळीराम पेठेपासून या कारवाईला सुरूवात करण्यात आली. बाजाराचा दिवस असल्याने बळीराम पेठेत व इस्लाम पुऱ्यातील रस्त्यावरील ठिकठिकाणी बसलेले भाजीपाला व फळ विक्रेते, कपडे विक्रेते व खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या मालासह जप्त करण्यात आल्या. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे विक्रेत्यांमध्ये एकच धावपळ उडाली. सुमारे तासभर या ठिकाणी कारवाई केल्यानंतर मनपाने सुभाष चौकातही रस्ता अडवून बसलेल्या अनेक विक्रेत्यांचे साहित्य जप्त केले. सुमारे सहा विक्रेत्यांच्या हातगाड्या व १५ ते २० विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आल्याचे अतिक्रमण विभागातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
सराफ बाजाराने घेतला मोकळा श्वास
अतिक्रमण विभागाने बळीराम पेठेतील कारवाई केल्यानंतर आपला मोर्चा सराफ बाजाराकडे वळविला. स्वातंत्र्य सेनानी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून ते भवानी मंदिरापर्यंतच्या मोकळ्या मैदानात बसलेल्या सर्व विक्रेत्यांची दुकाने हटविली. तसेच अनेक सराफ व्यावसायिकांनी उभारलेले शेडही यावेळी तोडण्यात आले. काही सराफ व्यावसायिकांनी कारवाई आधीच स्वत:हून शेड काढुन घेतली. यावेळी उपायुक्त वाहुळे यांनी सर्व सराफ व्यावसायिकांना नागरिकांना किंवा वाहतुकीला अडथळा ठरेल, असे कुठलेही अतिक्रमण दुकानासमोर न करण्याच्या सुचना केल्या. तसेच या व्यावसायिकांना दुकानासमोर वाहने न लावण्याच्याही सुचना करण्यात आल्या. तसेच भवानी माता मंदिराच्या पुढेही थेट रथ चौकापर्यंत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावरील लहान सराफ व्यावसायिकानांही उठविण्यात आले. यावेळी या व्यावसायिकांनी अनेक वर्षांपासून व्यवसाय करित असल्यामुळे, दुकाने हटविण्यास विरोध केल्यामुळे उपायुक्त व व्यावसायिकांमध्ये शाब्दीक वाद झाले.