लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एमआयडीसीत काही दिवसांपासून बंद असलेल्या एका कंपनीचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचे साहित्य लंपास केले. १ एप्रिल रोजी ही घटना उघडकीस आली होती. दरम्यान, याप्रकरणी शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चैतन्यनगरातील रहिवासी कुणाल शांताराम मेतकर यांच्या मालकीच्या वीणा फुडस् या कंपनीच्या गोडाऊनमध्ये ही चोरी झाली आहे. मेतकर यांनी २८ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता गोडाऊन बंद केले होते. यानंतर गोडाऊन उघडले नाही. दरम्यान, दोन दिवसांनी म्हणजेच, १ एप्रिल रोजी गोडाऊनचे त्यांना शटर तोडलेले दिसून आले. गोडाऊनमध्ये जावून मेतकर यांनी पाहणी केली असता चोरी झाल्याचे आढळून झाले. या गोडाऊनमधून एजीट्रेटर, क्रीम सेप्रेटर, वॉटर टँक, बॅलेन्स टँक, स्टील कंट्रोल पॅनल, गॅस बर्नल, स्टीलचे ट्रे, एमसीबी, ट्युब कंडेन्सर असे १ लाख ६० हजार रुपयांचे साहित्य चोरीस गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी मेतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी हे तपास करीत आहेत.