रावेर पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, स्टेशन रोडवरील न्यायालयाच्या समोर असलेल्या देवकीनगर भागातील प्लॉट नं. २५ मधील राजकुमार देवनदास गणवानी हे अहमदाबाद (गुजरात) येथे कामानिमित्त घर कुलूपबंद करून गेले होते. त्यांच्या कुलूपबंद घराची टेहळणी करून तीन अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश मिळवून पत्री व लाकडी कपाट तथा तिजोरीचे कुलूप तोडून २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे तीने शिक्के, ३० ग्रॅम वजनाची चांदीची वाटी, १० ग्रॅम वजनाचे १५ चांदीचे शिक्के, २० ग्रॅम वजनाचा चांदीचा लहान मुलांचा खेळण्याचा खुळखुळा तथा ४० हजार रुपये रोख असा १ लाख २२ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही बाब सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना ३० जूनच्या रात्री १ ते ३ वाजेच्या दरम्यान घडली.
राजकुमार देवनदास गणवानी हे २ जुलै रोजी अहमदाबादहून घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांनी रावेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तीन चोरट्यांविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिरते न्यायवैद्यकशास्त्र तपास पथकातील अंगुली ठसे तज्ज्ञांनी ठसे घेतले आहेत. पुढील तपास रावेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.