- असे आहे रब्बीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
गहू - ३७ हजार
हरभरा -९० हजार
मका - २७ हजार
दादर - ३१ हजार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून, अवकाळी पावसाचीही रिपरिप सुरू आहे. यामुळे रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंदा अतिवृष्टीमुळे आधीच खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आता रब्बीच्या सुरुवातीलाच
बेभरोसे हवामानामुळे रब्बीच्या हंगामालादेखील फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना कापसाव्यतिरिक्त इतर पिकांचे उत्पन्न न आल्यासारखेच आहे. खरीप हंगामातील नुकसानीची भर रब्बी हंगामात भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात रब्बीची लागवड केली. मात्र, निसर्गाच्या चक्राने पुन्हा शेतकऱ्यांचा अडचणी वाढवल्या आहेत. जिल्ह्यात यंदा ३ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यात हरभऱ्याची पेरणी सर्वाधिक आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असल्याने हरभऱ्यावर घाटअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच गहू व हरभऱ्याचा वाढीवरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे. यासह कापसाच्या फरदळचेदेखील नुकसान झाले आहे. फरदळ कापसाचेदेखील बऱ्यापैकी उत्पन्न जिल्ह्यातील शेतकरी घेत असतात. मात्र, पावसामुळे या कापसाचे नुकसान झाले आहे.
यासह शासकीय खरेदीदेखील थांबली असल्याने शेतकऱ्यांचा गुदामामध्ये माल पडलेला आहे. या पावसामुळे हा माल खराब होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
धुक्यामुळे अधिक फटका
जिल्ह्यात जर केवळ पाऊस झाला असता तर रब्बी पिकांना कदाचित यामुळे फायदा झाला असता. मात्र, ढगाळ वातावरणदेखील कायम असून, त्यासोबतच धुकेदेखील पडले असल्याने हे वातावरण मक्यावर पडणाऱ्या अळीला पोषक आहे. यासह हरभऱ्यावरदेखील घाटअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच मका व दादरच्या पिकालादेखील फटका बसण्याची शक्यता आहे.
ही घ्यावी काळजी
ढगाळ वातावरण कमी झाल्यानंतर हरभरा व मक्यावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामुळे चार ते पाच दिवसांनंतर लिंबोळी अर्काची फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
कोट..
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे नुकसानीची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. मात्र, पावसाचा मुक्काम वाढल्यास रब्बी पिकांवर परिणाम होऊ शकतो.
-अनिल भोकरे, कृषी उपसंचालक