लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - जिल्ह्यातील चाळीसगाव, चोपडा, पाचोरा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबे घेतले जातात. यंदा चांगला झालेला पाऊस यामुळे आंब्याचा झाडांना मोहोर आला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने मोहोर गळून पडत आहेत. त्यातच हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पाऊस झाल्यास मोहोर गळून पडेल व उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गावठी आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात नवीन शेतकऱ्यांनी तोतापुरी, केसर आंब्यांची देखील लागवड करण्यास सुरुवात केली आहे. चाळीसगाव, पाचोरा, मुक्ताईनगर भागातदेखील मोठ्या प्रमाणात आंबराई आहेत. गेल्या वर्षी ऐन मोहोरच्या काळात मार्च महिन्यातच अवकाळी पाऊस झाल्याने आंब्याचा ५० टक्के हंगामाचे नुकसान झाले होते. दरम्यान, सद्य:स्थितीत अनेक झाडांना कैऱ्या लागल्या आहेत. मात्र, पाऊस झाल्यास या कैऱ्यादेखील तुटून पडण्याची भीती असल्याची माहिती आंबे उत्पादक शेतकरी धर्मराज सोनवणे यांनी दिली.