जळगाव/मुंबई - शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची जोरदार बांधणी सुरू झाली आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा प्रमुखपदी अनिल ढिकले तर दिंडोरी ग्रामीणच्या जिल्हाप्रमुखपदी भाऊलाल तांबडे यांची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नियुक्ती केली आहे. तर, दुसरीकडे शिंदेंच्या महाराष्ट्र दौऱ्यालाही सुरुवात होत आहे. काही दिवसांपूर्वीच औरंगाबादच्या पैठण येथे एकनाथ शिंदेंची जाहीर सभा झाली होती. या सभेतून शिंदे गटाने मोठं शक्तीप्रदर्शन केलं. आता, राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये शिंदेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी मुक्ताईनगर येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या ठिकाणाची पाहणी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच ते जळगाव दौऱ्यावर येत आहेत. उद्या मुक्ताईनगर शहरातील क्रीडा संकुलाच्या मैदानामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर सभा होत आहे. त्यामुळे, एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदे काय बोलतील, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गटानं हिंदू गर्व गर्जना यात्रेची घोषणा केली आहे. या यात्रेची जोरदार तयारी जिल्ह्याजिल्ह्यात सुरू असून साताऱ्यात या यात्रेची धुरा शिंदे गटाचे शिलेदार व तरुण नेते पुरुषोत्तम जाधव यांच्या खांद्यावर आहे. यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेसोबत राष्ट्रवादीलाही लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे. त्याचमुळे जळगाव दौऱ्यातील मुख्यमंत्र्यांची सभा लक्षणीय राहणार आहे. २० सप्टेंबर ते शुक्रवार ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत ही यात्री निघणार आहे. यात्रेची सुरुवात २० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता स्वराज सांस्कृतिक भवन कोरेगाव रोड सातारा येथून होणार आहे.
नाशिकमध्ये शिंदेंकडून नवीन नियक्त्या
दरम्यान, खा. हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी अनिल ढिकले आणि भाऊलाल तांबडे यांना नाशिकच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्तीपत्र दिले. जनसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आपल्या पक्षाची शाखा गावागावात उघडा अशा सूचना वजा आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. येत्या काही काळात निश्चितच गाव तिथे आपल्या पक्षाची शाखा दिसेल अशी ग्वाही यावेळी खासदार गोडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिली आहे.