लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भविष्याच्या दृष्टीने पुराचा त्रास होऊ नये, यासाठी शेळगाव बॅरेजच्या कामात केलेल्या तांत्रिक बदलाचा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करीत जिल्ह्यातील सकारात्मक बदलाचे उदाहरण इतर प्रकल्पांसाठी दिले आहे.
जनहिताच्या विकास प्रकल्पांविषयी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग या कामांमध्ये झालेल्या बदलासंदर्भात जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरील शेळगाव बॅरेजचे उदाहरण दिले होते. यात एखादा प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्याच्या रचनेत काही वेळा बदल करावा लागतो, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते. यात शेळगाव बॅरेजचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
तांत्रिक मात्र भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय
शेळगाव बॅरेजचे काम सुरू झाल्यानंतर २०१०मध्ये प्रकल्पाची पातळी साडेनऊ मीटरने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुळात तापी नदी ही पुराच्या संदर्भात राज्यात सर्वात मोठी नदी मानली जाते. त्यादृष्टीने पुराचा विचार करीत भविष्यात त्रास होऊ नये व गावांनाही प्रकल्पामुळे बाधा होऊ नये, यासाठी प्रकल्पात तांत्रिक बदल करीत साडेनऊ मीटरने पातळी वाढविण्यात आली होती. २०० वर्षे राहणारा हा प्रकल्प असल्याने त्या दृष्टीने हे तांत्रिक बदल करावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हा जनहिताचा निर्णय असल्याने जळगाव जिल्ह्यातील सकारात्मक निर्णय म्हणून त्याची दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी उल्लेख केला, हे विशेष.