जळगाव : सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे नियंत्रण राहणार असल्याच्या निर्णयाचे सहकार क्षेत्रातून स्वागत केले जात असून या निर्णयामुळे सहकारी बँका सदृढ व सुनियंत्रित होण्यास मदत होईल, असा सूर सहकार भारती, जिल्हा बँक, सहकारी बँकांच्या पदाधिकाऱ्यांकडून उमटला आहे. तर जिल्हा सहकार बोर्डाच्यावतीने सहकार क्षेत्र समृद्ध आहे, त्याला कोणाच्या नियंत्रणाची गरज नाही, असे मत व्यक्त करण्यात आले.ठेवीदारांच्या हिताचे रक्षण, पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेसारखे घोटाळे रोखणे तसेच सहकारी बँका मजबूत करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने बँकिंग नियमन कायद्यात दुरुस्ती करण्यास मंजुरी देत सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे नियंत्रण राहणार असल्याचा निर्णय घेतला. या निर्णयासंदर्भात सहकार क्षेत्रातून मते जाणून घेतले असता बहुतांश जणांनी स्वागत केले तर काही प्रमाणात विरोधही करण्यात येत आहे.दीर्घकालीन निर्णय, आर्थिक शिस्त लावणे आवश्यक होतेसहकारी बँकांवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया व राज्य सहकार विभाग असे दुहेरी नियंत्रण असायचे. यात दोघांच्या अधिकारांच्या कार्यक्षेत्राविषयी अडचणी येत होत्या. त्यामुळे बँकिंग नियमन कायद्यात दुरुस्ती करण्याविषयी सहकार क्षेत्रातून मागणी केली जात होती व तशी गरजही होती, असे जाणकारांनी सांगितले. त्यामुळे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेसारखे अनुभव पाहता सहकार क्षेत्राविषयी तातडीने पावले उचलण्यासाठी हे नियंत्रण आवश्यक होते व तसा निर्णय झाल्याने त्याचे स्वागत करीत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे दीर्घकालीन निर्णय घेणे, आर्थिक शिस्त लावण्यासही मदत होणार असल्याचाही सूर उमटत आहे.ठेवीदारांच्या हिताचा निर्णयया निर्णयामुळे सहकार क्षेत्राला फायदा होणारच असून ठेवीदारांच्या हिताचेही रक्षण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही जुनीच मागणी होती, मात्र आरबीआय मूळ विषयाकडे लक्ष न देता इतर बाबींकडे लक्ष देते व शेवटच्या क्षणी जागे होते. पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेच्या वेळीदेखील आलेला अनुभव त्याचेच उदाहरण असून आरबीआयने तत्परता पाळावी, अशीही मागणी होत आहे.सहकार क्षेत्र समृद्ध, नियंत्रणाची गरज नाहीसहकार क्षेत्रामुळेच आज देशाचा मोठा विकास झाला आहे. सहकार क्षेत्रातील सहकारी स्वत:ला झोकून देत काम करीत असतो. सहकार स्वयंभू असून त्यातून लोकहिताचेच निर्णय घेतले जातात तसेच सहकार क्षेत्र समृद्ध, त्याला कोणाच्या नियंत्रणाची गरज नाही, असा सूर जिल्हा सहकार बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांकडून उमटला.सहकार क्षेत्रासाठी हा चांगला निर्णय आहे. यामुळे सहकारी बँकांना मार्गदर्शनच होईल व संचालक, संस्थांच्या भरभराटीसही मदत होईल.- अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, अध्यक्षा, जळगाव जिल्हा सहकारी बँकसहकारी बँकांवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे नियंत्रण राहणार असल्याने त्याचा सहकार क्षेत्राला फायदाच होईल. सहकार भारतीतर्फे ही मागणी कित्येक दिवसांपासून केली जात होती. या निर्णयाने ठेवीदारांच्या हिताचेही रक्षण होण्यास मदत होईल.- संजय बिर्ला, अध्यक्ष, सहकार भारती.सहकारी बँकांविषयी दीर्घकालीन निर्णय घेणे, आर्थिक शिस्त लावणे, अशा बाबींसाठी नियंत्रण आवश्यकच होते. या बदलाचे स्वागत असून यामुळे सहकारी बँका सदृढ आणि सुनियंत्रित होण्यास मदत होईल.- अनिल राव, अध्यक्ष, जळगाव जनता सहकारी बँक.सहकार क्षेत्रातील मंडळी चांगले काम करीत असून सहकार क्षेत्राचामुळेच देशाची भरभराट झाली आहे. हे क्षेत्र आधीच समृद्ध आहे, त्याच्यावर कोणाच्या नियंत्रणाची गरज नाही.- सुदाम पाटील, संचालक, जळगाव जिल्हा सहकार बोर्ड.पूर्वी सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे नियंत्रण होते. मध्यंतरी ते निघाले व आता पुन्हा नियंत्रण आल्याने त्याचा फायदाच होईल. विशेष म्हणजे लेखापरीक्षण व इतर व्यवहारांविषयी काटेकोरपणा राहील.- गजानन मंडोरे, निवृत्त तालुका उपनिबंधक
सहकारी बँका सदृढ व सुनियंत्रित होण्यास मदत होणार - आरबीआय नियंत्रणाबाबतच्या निर्णयाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 12:36 PM