जामनेर : तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार करुनही सरकारी स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नसल्याने तालुक्यातील कुंभारी येथील लाभार्थी ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी शुक्रवारी येथील तहसीलदार कार्यालयात धडक देवून पुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घातला. धान्य का मिळत नाही, असा प्रश्न विचारला. त्यामुळे कार्यालयात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, घेराव घातल्यानंतर संतप्त लाभार्थी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात थांबून होते.जामनेर तालुक्यातील कुंभारी बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकानदाराबाबत वारंवार तक्रार करून देखील पुरवठा विभागाने धान्य उपलब्ध करून दिले नसल्याने ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले. कुंभारी बुद्रुक ग्रामस्थांनी शुक्रवारी तहसीलदार कार्यालयावर धडक देत पुरवठा अधिकाºयांनाच घेराव घातला. सुमारे दीड तास चाललेल्या या गोंधळानंतर या दुकानदाराला वितरित केलेला धान्याचा कोटा तोंडापुरच्या दुकानदाराकडे हस्तांतरी करून तो कुंभारीच्या ग्रामस्थांना वितरणाचे आदेश दिल्यानंतर घेराव आंदोलन मागे घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.तालुक्यातील कुंभारी बुद्रुकच्या धान्य दुकानांबाबत ग्रामस्थांनी पुरवठा विभागाकडे केलेल्या तक्रारीवरून नायब तहसीलदारांनी चौकशीदेखिल केली आहे व त्याचा अहवालही सादर केला आहे. तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे चौकशी अहवाल पाठवून कारवाईची मागणीदेखिल केली आहे.दरम्यान, गुरुवारी दुकानदाराला जामनेर येथील शासकीय गुदामातून वाटपासाठी धान्य पुरवठा करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी जामनेरला धाव घेत पुरवठा अधिकाºयांना याचा जाब विचारीत घेराव घातला. दुकानदाराच्या मनमानी कारभाराने शिधापत्रिकाधारक त्रस्त झाले असून त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. संतप्त महिला पुरवठा अधिकारी यांना तक्रार असूनदेखिल दुकानदारास धान्य पुरवठा का केला याचा जाब विचारीत होते. आधीच हाताला काम नाही, धान्य मिळत नाही व १०० रुपये भाडे खर्च करून यावे लागते असे सांगत महिलांनी संताप व्यक्त केला.कुंभारीचा धान्यकोटा तोंडापूर दुकानदाराकडेदरम्यान,जामनेर तालुक्यात केवळ कुंभारी बुद्रुक पुरता धान्य वितरणाचा प्रश्न नाही तर तो इतर गावांमध्येदेखिल आहे. कुंभारीच्या लाभार्थींनी त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली.त्यामुळे त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न शासन दरबारी पोहचला आहे. कुंभारी ग्रामस्थ आक्रमक झाल्याने प्रशासन नमले आहे. त्यांनी कुंभारीचा धान्य कोटा तोंडापूर येथील दुकानदाराकडे वर्ग केला आहे.
पुरवठा अधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 6:41 PM