लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एमआयडीसीतील बी सेक्टरमध्ये असलेल्या रूख्मा इंडस्ट्रीज कंपनीच्या आवारात पडलेल्या कोळशाला बुधवारी सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. दरम्यान, वेळीच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
एमआयडीसी परिसरातील बी-२० सेक्टरमध्ये रूख्मा इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. ही कंपनी अनेक वर्षांपासून बंद आहे. बुधवारी सकाळी कंपनीच्या आवारात असलेल्या कोळशाला अचानक आग लागली. हा प्रकार परिसरातील कामागारांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसांनी घटना कळविली. नंतर पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. काही वेळातच मनपाचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत कुठलेही नुकसान झालेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील असीम तडवी, चेतन सोनवणे, योगेश बारी आदींनी धाव घेतली होती.
एन-१६ सेक्टरमध्येही आग
एमआयडीसीतील एन-१६ सेक्टरमध्ये एका कंपनीला सुध्दा मंगळवारी रात्री ९.३० वाजता आग लागली होती. आगीची माहिती मिळाल्यानंतर लागलीच मनपाचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. नंतर आगीवर पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली.