ऑनलाईन लोकमत
भुसावळ, दि.16 - महाजनकोच्या दीपनगर ( भुसावळ) येथील वीज निर्मिती केंद्राला देखील कोळसा टंचाईचा सामना करावा लागत आहे. दीपनगर वीज निर्मिती केंद्राला रोज 18 हजार टन कोळशाची गरज आहे, मात्र प्रत्यक्षात या केंद्राला सध्या 12 हजार टन कोळसा उपलब्ध होत असल्याची माहिती या केंद्राच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
महाजनकोच्या दीपनगरात वीज निर्मिती करणारे एकूण 210 मेगाव्ॉट क्षमतेचे दोन व 500 मेगाव्ॉट क्षमतेचे दोन असे चार संच आहेत.पैकी 210 मेगाव्ॉट क्षमतेचा संच क्रमांक दोन या आधीच बंद केला आहे. दुसरा 210 मेगाव्ॉट क्षमतेचा संच क्रमांक तीन हा याच महिन्यात वीजेची मागणी घटल्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, वीजेची मागणी वाढताच काही दिवसांनी हा संच पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती या केंद्राचे मुख्य अभियंता आर. आर. बावस्कर यांनी ‘लोकमत’ला दिली.
दीपनगर वीज निर्मिती केंद्राला मिळणारा कोळसा हा रेल्वे मार्गाने पुरवला जातो.त्यासाठी वरणगाव रेल्वे स्थानकावरुन विशेष रेल्वे लाईन दीपनगर वीज केंद्रासाठी अंथरण्यात आली आहे. सध्या दीपनगरसाठी रोज चार रॅक कोळसा मिळत आहे. एका रेल्वे रॅकला 59 डबे असता म्हणजे त्यात 36 हजार टन कोळसा असतो. दीपनगर वीज निर्मिती केंद्रासाठी रोज सहा रॅक कोळशाची गरज असताना सध्या मात्र चारच रॅक कोळसा मिळत आहे.
राज्यभर कोळशाची समस्या निर्माण झाली आहे. दीपनगर केंद्रातही ही समस्या आहे. दीपनरात 500 मेगाव्ॉट क्षमतेचे दोन संच सुरू आहेत.त्यासाठी रोज 18 हजार टन कोळशाची गरज असताना प्रत्यक्षात 12 हजार टन कोळसा उपलब्ध होत आहे. या समस्येवर वरिष्ठ पातळीवरुन मार्ग काढला जात आहे. पंधरा दिवसात कोळशाची समस्या सुटेल. -आर. आर.बावस्कर, मुख्य अभियंता, दीपनगर वीज निर्मिती केंद्र, भुसावळ.