विलास बारी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्यात एकत्र असलेल्या या पक्षांचे जिल्ह्यात मात्र तीन दिशांना तोंडे आहेत. काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये स्वबळाची भाषा केल्याने तिन्ही पक्षांनी जिल्ह्यात संघटनेच्या बांधणीवर भर दिला असल्याने राज्यस्तरावरील नेत्यांचे दौरे वाढले आहेत.
जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र यावेळी मुक्ताईनगरच्या अपक्ष आमदारांसह तब्बल पाच आमदार हे शिवसेनेचे विजयी झाले आहेत. त्यापाठोपाठ भाजप चार तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक आमदार आहेत.
आगामी काळात जिल्हा बँक, दूध संघासह अन्य निवडणुका आहेत. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी संघटन बांधणीवर भर दिला आहे. शिवसेनेकडून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे, युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचा दाैरा झाला आहे. तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे दौरे झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी व उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच जिल्हा दाैऱ्यावर येणार आहेत.
जळगाव पंचायत समिती
जळगाव पंचायत समिती ही शिवसेनेच्या ताब्यात आहे. एकूण दहापैकी सात सदस्य हे शिवसेनेचे तर तीन सदस्य हे भाजपचे आहेत.
जिल्हा परिषद
जळगाव जिल्हा परिषदेत एकूण ६७ सदस्य संख्या आहे. त्यात सेना व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक सदस्य अपात्र आहे. सध्या जि.प.मध्ये भाजप ३३, राष्ट्रवादी १५, शिवसेना १३ व काँग्रेसचे ४ सदस्य आहेत. सध्या भाजप व काँग्रेस या ठिकाणी सत्तेत सोबत आहेत.
जळगाव महापालिका
जळगाव महापालिकेत सध्या भाजपतील बंडखोर सदस्याच्या पाठिंब्याने शिवसेनेची सत्ता आहे. या ठिकाणी शिवसेनेचे १५, भाजप बंडखोर ३० व भाजपचे २७ तर एमआयएमचे ३ नगरसेवक आहेत. महापालिकेत राष्ट्रवादी व काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही.
तीन पक्ष, तीन विचार
१) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा काही दिवसांपूर्वी खान्देश दाैरा झाला. या दरम्यान त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले होते. प्रदेशाध्यक्षांची ही भूमिका जिल्हा काँग्रेस कमिटीने कायम ठेवली आहे.
२) काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचा दाैरा झाला. त्यांनीदेखील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्या दृष्टीने संघटनेच्या बांधणीसाठी शिव संपर्क अभियान सुरू करीत तयारी सुरू केली आहे.
३)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेदेखील संघटनवाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मुंबईत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शासकीय समित्यांवर स्थान दिले जात नसल्याची तक्रार करण्यात आली.
जिल्हा प्रमुख काय म्हणतात..
१)पक्षवाढीचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आता प्रत्येक जण स्वबळाची भाषा करीत असले तरी निवडणुका घोषित झाल्यानंतर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येतील. भविष्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणुका होतील.
: ॲड.रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
२) काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जिल्ह्यात स्वबळावर निवडणुका लढविण्याचा आदेश दिला आहे. त्या दृष्टीने जिल्हा काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने जिल्हाभरात दौरे सुरू केले असून स्वबळाची तयारी सुरू आहे.
: ॲड.संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
३) शिवेसेनेत पक्षप्रमुखांकडून जो आदेश दिला जाईल त्या दृष्टीने आगामी निवडणुका लढविल्या जातील. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून संघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. पक्षाला चांगला प्रतिसाद आहे.
: विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख, जळगाव