जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होईल. विशेष म्हणजे, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे.
या निवडणुकींसाठी नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जातील. त्यांची छाननी ही ३१ डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ४ जानेवारीपर्यंत मागे घेता येईल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हवाटप होईल. दुसरीकडे २२, २३ आणि २४ रोजी सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत निघणार आहे. ही सोडत तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली होईल, तर महिला आरक्षण सोडत ही प्रातांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे हालचाली सुरू झाल्या असून, आचाररसंहिता लागू करण्याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. जळगाव तालुक्यातील आसोदा, आव्हाणे, ममुराबाद, म्हसावद, शिरसोली, मोहाडी, नशिराबाद या मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जोरदार चुरस पहायला मिळेल.
निवडणूक जाहीर झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती
जळगाव - ४३
जामनेर - ७३
एरंडोल - ३७
धरणगाव - ४७
भुसावळ - २६
मुक्ताईनगर - ४९
यावल - ४८
बोदवड - ३०
रावेर - ४८
अमळनेर - ६७
पारोळा - ५८
चोपडा - ५२
पाचोरा - ९६
भडगाव - ३३
चाळीसगाव - ७६