पर उपकारी, नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया ।। संत लक्षण सर्वांच्याच आचरणात उतरावे अशी तुकोबारायांची अपेक्षा आहे. त्यांच्याच चरित्रकथेनुसार तुकोबांना भ्रष्ट करण्याची सुपारी त्यांच्या निंदकांनी दिली होती. त्यांनी तिला माता म्हणून हाक मारली आणि आम्ही विष्णुदास तसे नसतो हेही निक्षून सांगितले. तुकोबारायांची ही चरित्रकथा आम्ही केवळ कथा कीर्तनातूनच सांगायची काय? तिचे अनुसरण आम्ही कधी करणार आहोत? ‘यादेवी सर्व भुतेषु मातृरुपेण संस्थिता’ अशा शब्दात मातृस्वरुप शक्तीची उपासना एकीकडे करायची आणि दुसरीकडे तीच मातृशक्ती स्त्रीरुपात समोर आली की भोगदृष्टीने तिच्याकडे पाहायचे हा शुद्ध दांभिकपणा आहे. त्याचा निषेध तुकोबारायांनी केला आहे. सीतेचा शोध घेत असताना जे दागिने रस्त्यात सापडले त्यातले केवळ पैंजण लक्ष्मणाला ओळखता आले की, हे सीतेचे आहेत. ‘नाहं जानामि केयुरे, नाहं जानामि कुंडले’ म्हणणाऱ्या लक्ष्मणाचे उदात्त चारित्र्य ही केवळ कथाकीर्तनातून सांगायची गोष्ट ठरू नये तर तो तुमचा आमचा सर्वांचा जीवनादर्श ठरला पाहिजे. पर उपकरासाठी पैसा लागत नाही. कृतीने, वाणीनेही उपकार करता येतो. परनिंदेपासून दूर राहिले तर वाचिक पाप होत नाही. आणि परस्त्री मातेसमान मानली तर कायिक पाप घडणार नाही. अशा रितीने कायिक, वाचिक व मानसिक पापापासून रोखून शुद्ध पुण्य संपादनाचा सोपा मार्ग तुकोबाराय सांगत आहेत.- प्रा.सी.एस.पाटील, धरणगाव.
आचार- विचार सुचिताची संहिता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:23 PM