विविध हवामान संस्थेने नोंदवलेले तापमान
आयएमडी - ९ - ३०
स्कायमेट - ७ - २९
ॲक्युवेदर - ८ - ३०
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यंदा हिवाळ्यातील पहिल्या तीन महिन्यात पाठ फिरवलेल्या थंडीने फेब्रुवारी महिन्यात जोरदार पुनरागमन केले आहे. मंगळवारी जळगाव शहरातील किमान तापमानाने तब्बल १३ वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. २००८ मध्ये ९ फेब्रुवारी रोजी तापमान ८ अंशावर होते. तर मंगळवारी शहराचा पारा ७ अंशांपर्यंत खाली घसरला होता. तापमानात मोठी घट झाल्यामुळे जळगावकरांना हुडहुडी भरली असून, याचा परिणाम जनजीवनावरदेखील होताना दिसून येत आहे. दरम्यान, येणाऱ्या दोन दिवसात थंडीची लाट कमी होऊन तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
यंदा तापमानात मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान थंडी गायबच होती. काही दिवस पारा घसरला, मात्र यामध्ये सातत्य नसल्याने तापमानाचा पारा सरासरी १६ अंश इतकाच होता. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून तापमानात मोठी घट होत असून, मंगळवारी पारा ७ अंशांवर आला होता. मंगळवारी तापमानाने यंदाच्या हंगामातील नीचांकासोबतच गेल्या १३ वर्षांचा विक्रमदेखील मोडीत काढला आहे.
तापमानात घट होण्याचे कारण काय?
१. जळगाव जिल्ह्यात साधारणपणे नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यात थंडीचा कहर जाणवत असतो. मात्र, यंदा या तीन महिन्यातच थंडीचा कडाका कमी होता. अरबी व बंगालच्या उपसागराकडून वाहत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडकाव केला होता. त्यामुळे या तीन महिन्यात थंडीचा कडाका जाणवलाच नाही.
२. जानेवारी महिन्याचा शेवटच्या आठवड्यात अरबी व बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे बंद झाले. त्यातच उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली. यामुळे थंड वारे पुन्हा सक्रिय होऊन, महाराष्ट्राकडे सरकले. त्यातच महाराष्ट्रातील सध्याचे वातावरण कोरडे असल्याने उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांना एक प्रकारे मार्गच मोकळा झाला. यामुळे फेब्रुवारी महिन्यात थंडीचा कडाका वाढला आहे.
दोन दिवसात तापमानात होणार वाढ
दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून थंडीचा कडाका वाढला होता. मात्र, येणाऱ्या दोन दिवसात वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता असून, दोन दिवसात सरासरी तापमानात तब्बल ५ अंशांची वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. किमान तापमानात १५ अंशांपर्यंत तर कमाल तापमान ३५ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील आठवड्यापासून जळगावकरांना उन्हाळ्याची चाहूल लागण्याची शक्यता आहे.
येणाऱ्या पाच दिवसांचा तापमानाचा अंदाज
१० फेब्रुवारी - ११ - ३१
११ फेब्रुवारी - १३ - ३२
१२ फेब्रुवारी - १३ - ३३
१४ फेब्रुवारी - १४ - ३३
१५ फेब्रुवारी - १६- ३५
कोट..
यंदा वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम हिवाळ्यावर दिसून आला. ज्या काळात थंडी सर्वाधिक पडायची त्या काळात यंदा थंडी कमी झाली व फेब्रुवारी महिन्यात थंडीचा कडाका वाढला. जागतिक हवामानात होत असलेल्या बदलाचा हा परिणाम असेल. दरम्यान, आठवड्याभरात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
- नीलेश गोरे, हवामान तज्ज्ञ