लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : थंडीचा कडाका आता चांगलाच जाणवू लागला असून, गेल्या तीन दिवसांपासून १० अंशापेक्षा पुढे गेलेला नाही. तसेच उत्तर भारतात अजून काही दिवस तीव्र बर्फवृष्टी होणार असल्याने उत्तरेकडून जिल्ह्यात थंड वाऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे. आगामी आठवडाभर जिल्ह्यात थंडीची लाट कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच यंदा ‘ला लीना’चा प्रभावदेखील वाढला असल्याने थंडीचे प्रमाण जानेवारी महिन्यातही वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांपासून थंडीचे प्रमाण वेगवेगळे व अस्थिरच राहिले आहे. यामुळे डिसेंबर महिन्यातच काही प्रमाणात थंडीचा कडाका जाणवतो, मात्र अन्य दिवसात ढगाळ वातावरण व कमी दाबाच्या पट्ट्यामुळे थंडी तशी गायबच राहत आहे. मात्र, काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असून, किमान पारा १० अंशापर्यंत कायम आहे. यंदा कोरोनामुळे नागरिकांनी अगोदरपेक्षा यंदाच्या थंडीत विशेष काळजी घेतली आहे. शरीर गरम ठेवण्यासाठी सकाळी ८ वाजेपर्यंत घरातच थांबून राहत आहे, तर अनेकजण मॉर्निंग वॉकव्दारे आरोग्याची काळजी घेत आहेत.
रब्बीला फायदा
कडाक्याच्या थंडीमुळे रब्बीतील हरभरा व गहू या पिकांना लाभ मिळत आहे. दव पडत असल्याने कोरडवाहू जमिनीवर लागवड असलेल्या दादर व मक्यालाही या थंडीचा लाभ होत आहे. दरम्यान, केळीला मात्र यामुळे काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. यंदा पीकविम्याचे निकषदेखील जाचक असल्याने केळी पिकाचे नुकसान झाले तरी लाभ मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
आगामी पाच दिवसांचा अंदाज
२५ डिसेंबर - ९ अंश
२६ डिसेंबर - ८ अंश
२७ डिसेंबर - ९ अंश
२८ डिसेंबर - ९ अंश
२९ डिसेंबर - ७ अंश