जळगाव : उत्तरेकडील राज्यांमध्ये होत असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे येत्या आठवडाभरात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच जिल्ह्यातदेखील कोरडे हवामान कायम असल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना कुठलीही आडकाठी नसल्याने थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मात्र, हिंद महासागरात निर्माण होत असलेल्या चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने सरकल्यास पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
कमी दरात लाकडे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सादर
जळगाव : शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीत नागरिकांना कमी दरात अंत्यसंस्कारासाठी लाकडे उपलब्ध करून देण्यासाठी या भागातील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी १६ रोजी होणाऱ्या महासभेत प्रस्ताव सादर केला आहे. १६ रोजी होणाऱ्या महासभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. नेरीनाका स्मशानभूमीनंतर या स्मशानभूमीतदेखील नागरिकांना कमी दरात लाकूड उपलब्ध होऊ शकणार आहे.
रब्बीची ९० टक्के पेरणी पूर्ण
जळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामाची जवळपास ९० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात तब्बल एक लाख हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड करण्यात आली आहे. यासह यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे आवर्तनेदेखील चांगली मिळणार असल्याने गव्हाच्या क्षेत्रातदेखील वाढ झाली आहे. यासह ज्वारी, मक्याचा क्षेत्रातदेखील गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाली असून, येत्या दोन दिवसात जिल्ह्यात रब्बीची १०० टक्के पेरणी पूर्ण होण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी
जळगाव : तेली समाजबांधवांचे आराध्यदैवत संताजी जगनाडे महाराज यांची ३९६ जयंती तेली समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे साजरी करण्यात आली. यावेळी कोरोनाकाळात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या डॉ.दीपक चौधरी व सुष्मा चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापाैर सुनील खडके, सीताराम चौधरी, उमेश चौधरी, सीताराम देवरे, रवींद्र चौधरी, अशोक चौधरी, कमल चौधरी आदी उपस्थित होते.