अमळनेर : तालुक्यातील सावखेडा येथील तापी पात्रातील गणपती विसर्जनानंतर अनेक मूर्तींची विटंबना , वाताहत, मोडतोड पाहता शहरातील विकी जाधव मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी भर पावसात नदी पात्रातील मूर्र्तींचे संकलन करून त्यांची रीतसर विल्हेवाट लावून धार्मिक भावना जोपासल्या आहेत . त्यातून सामाजिक शांतता, स्वच्छता व पर्यावरण संवर्धन केले गेले . ‘लोकमत’ने याबाबत शनिवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची अशी विधायक दखल घेण्यात आली.यंदाच्या गणेशोत्सवात पाचव्या दिवसांपासून गणपतीचे विसर्जन करण्यात येत असून अमळनेर व चोपडा तालुक्यातील गणपती मूर्र्तींचे विसर्जन सावखेडा येथील तापी नदी पात्रात केले गेले. मात्र अनेक भक्तांनी पुलावरूनच मूर्ती फेकल्याने त्यांची मोडतोड झाली. तसेच नदी पात्रात पाणी नसल्याने लहान मोठ्या अशा हजारो मूर्त्या विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या होत्या. एरवी गणेश मंडळात भक्तीभावाने पूजा, आरती करणारे भक्त विसर्जन वेळी गणेशाची अशी अवस्था करतात याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते.अप्रत्यक्षपणे मूर्र्तींची विटंबना होत होती. गणपतीचे तोंड, सोंड, दात, हात, पाय असे अवयव तापी पात्रात पडलेले होते मात्र एकही मंडळ रितसर विसर्जन वा विल्हेवाट लावण्यासाठी पुढे आले नाही ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून सामाजिक संघटनांना आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत अखेर अमळनेरचे विकी जाधव यांनी त्यांच्या मित्र परिवाराचे कार्यकर्ते यांना सोबत घेऊन तसेच ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी मशीनसह भर पावसात तापी पात्रात उतरले आणि पात्रातील लहान मोठ्या सर्व मूर्त्या गोळा करून त्यांचे रीतसर विसर्जन केले. मोठ्या मूर्र्तींसाठी पाणी नव्हते म्हणून त्यांनी नदी पात्रात खड्डे खोदले व त्या पाण्यात मोठ्या गणपतींचे विसर्जन केले. जाधव मित्र परिवाराच्या या कार्यामुळे पोकळ भक्ती दाखवणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घातले गेले आहे. त्यांचे हे कौतुकास्पद कार्य पाहून प्रांताधिकारी संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व अमळनेरातील सामाजिक संघटनांनी अभिनंदन केले आहे.
उघड्यावर पडलेल्या गणेश मूर्ती संकलित करून विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:31 AM
अमळनेर तालुक्यातील सावखेडा आणि चोपडा तालुक्यातील नीमगव्हाण येथील तापी नदीपात्रात विसर्जनानंतर उघड्यावर पडलेल्या गणपतीच्या शेकडो मूर्ती गोळा करुन अमळनेरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे विधीवत विसर्जन केले. या बाबत लोकमतने शनिवारच्या अंकात सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते.
ठळक मुद्देतापी पात्रातून तूटफूट झालेल्या शेकडो मूर्ती केल्या गोळा पात्रातच खड्डा खोदून केले मूर्ती विसर्जन