डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीविचार मंचचा उपक्रम
जळगाव,दि.14 - डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीविचार मंचाकडून ‘एक वही एक पेन संकलन’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाव्दारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर हार व पुष्पगुच्छ अर्पण न करता वह्या व पेन जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला साद देत अनेक भिमसैनिकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला वही व पेन अर्पण करून आगळ्या-वेगळ्या पध्दतीने अभिवादन केले. या उपक्रमाव्दारे 3 हजार वह्यांचे संकलन झाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाव्दारे गेल्या तीन वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील गरीब विद्याथ्र्याना शिक्षण मिळावे यासाठी काम केले होते. आजही समाजातील अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहात आहेत. यासाठीच हा उपक्रम राबविण्यात आला. या ठिकाणी संकलन करण्यात आलेल्या वह्यांचे लवकरच वाटप करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले.
पोस्टर प्रदर्शनातून उलगडला बाबासाहेबांचा जीवन प्रवास
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अस्पृश्यतेविरोधात केलेले कार्य, त्यांनी घेतलेले शिक्षण, विद्याथ्र्यासाठी केलेले कार्य असा सर्व जीवनपट शुक्रवारी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय संस्थेतर्फे भरविण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनातून उलगडून दाखविण्यात आला.महानगर पालिकेसमोर भरविण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन मुकुंद सपकाळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी संजय सपकाळे, संस्थेचे अध्यक्ष गोविंदा सोनवणे, उपाध्यक्ष योगराज सोनवणे, संजय शिरसाठ, हिरालाल सांळूखे, राजु महाले, सुनील सुरवाळे, शिवदास सपकाळे आदी उपस्थित होते. बाबासाहेबांचे शिक्षण, त्यांचे अस्पृश्यतेबद्दल असलेले विचार, मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर प्रवेश, महाडचे आंदोलन, पुणे करार अशा घटनांचे सर्व दर्शन या प्रदर्शनातून घडविण्यात आले. सकाळपासूनच या ठिकाणी अनुयायींनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती.