जळगाव : सिनियर विद्यार्थ्यांनी २८ विद्यार्थ्यांना विवस्त्र करून सामूहिक रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावच्या इकरा युनानी महाविद्यालयात उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांची महाविद्यालयातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुदस्सर मुख्तार इनामदार ( १९, रा.परभणी) या विद्यार्थ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. शुक्रवारी पालकांनी मुदस्सर याला वसतिगृहात दाखल केले. यानंतर शनिवारी त्याच्या बॅचचा पहिलाच दिवस होता.रात्री सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या वसतिगृहात आपापल्या रुममध्ये होते. यावेळी १५ ते २० सिनीयर्स विद्यार्थ्यांनी पहाटे दोन वाजता नव्याने दाखल झालेल्या २८ विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या एका हॉलमध्ये नेऊन रॅगिंग केले.
मुदस्सर याने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन वाजता काही विद्यार्थ्यांना विवस्त्र करण्यात आले. त्यानंतर सिनेमातील पात्र, प्रियकर-प्रेयसी यांच्याप्रमाणे अॅक्टिंग करण्यास सांगून नंतर शिवीगाळ करीत एकेक विद्यार्थ्यांची ओळख-परेड घेतली.मुदस्सरने विरोध करताच तीन-चार जणांनी त्याला मारहाण केली आणि त्याच्या खिशातील मोबाईल काढून कचरापेटीत फेकला. तसेच खिशातील १८ हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर त्याला फुंकर मारुन ट्युब लाईट विझवण्यास सांगितले, अन्यथा हीच ट्युबलाईट अंगावर फोडू, असे धमकावण्यात आले. हा त्रास असह्य झाल्यानंतर मुदस्सरने हॉलमधून पळ काढत स्वत:ची सुटका करुन घेतली.
सुरक्षा रक्षकाच्या मदतीने फोन करुन मुदस्सरने पालकांना माहिती दिली. पालकांनी विचारणा केल्यानंतर प्राचार्य डॉ. शोएब शेख यांनी घटनेची चौकशी दोषी तीन विद्यार्थ्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली.राष्ट्रीय अॅन्टी रॅगिंंग समितीकडे तक्रारमुदस्सर याने पहाटे दिल्ली येथील अँटी रॅगिंग समितीकडे मेलव्दारे तक्रार केली. प्राचार्य डॉ. शेख यांनी सर्व २८ मुलांचे लेखी जबाब नोंदवून घेतले. मुदस्सरचे वडील परभणी येथे होमगार्ड समादेशक म्हणून कार्यरत आहेत.महाविद्यालयात झालेला रॅगिंंगचा प्रकार चुकीचा आहे़ संबंधित विद्यार्थ्याने पोलिसात व अॅन्टी रँगिंग समितीकडेही तक्रार केली असून प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत.- डॉ़ करीम सालार,संस्थापक अध्यक्ष, इकरा संस्था