ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 10 - पर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्या मूर्तीमुळे प्रदूषण रोखणे शक्य असल्याने यामुळे प्रशासनावरील ताणही कमी होतो. त्यामुळे शाडू मातीच्या गणेश मूर्ती वापराबाबतचा विषय मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून राज्य स्तरावर पोहचवू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली. पर्यावरणपूरक आणि धर्मशास्त्रानुसार सुसंगत अशा शाडूमातीच्या श्री गणेशमूर्तीचे वितरण केंद्र टॉवर चौकात श्री कला केंद्राच्यावतीने उभारण्यात आले असून त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याहस्ते 10 ऑगस्ट रोजी करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, अॅड. सुशील अत्रे, सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, दीपक जोशी उपस्थित होते. शाडू मातीच्या मूर्ती बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्यास प्रशासनावरचा भार कमी होईल. अशा उपक्रमांना प्रसिध्दी मिळायला हवी, अशीही अपेक्षा जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी बालपणाच्या आठवणींना उजाळा देऊन या मूर्तीचे कौतुक केले. या मूर्तीकडे पाहून प्रसन्नता वाटत आहे, इतर मूर्ती आणि या मूर्तीमध्ये खूप फरक आहे, असे उपक्रम सर्वानी आयोजित करून याचा प्रसार करायला हवा, अशी अपेक्षा जिल्हाधिका:यांनी व्यक्त केली.
यावेळी सचिन नारळे यांनी सांगितले की, शहरातील सर्व गणेशमंडळांना आम्ही आवाहन केले आहे की, मंडपातील श्रींची मूर्ती शाडूमातीचीच बसवावी या संकल्पनेला चांगला प्रतिसाद आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन श्री कलाकेंद्राच्या वतीने अनिता पोळ यांनी केले. सूत्रसंचालन श्री कला केंद्राचे रवींद्र हेंबाडे यांनी केले.