जळगाव : शहरातील खान्देश कॉलेज एज्युकेशन संस्था संचलित मुळजी जेठा महाविद्यालयाला विद्यापीठ आयोगाने (युजीसी) स्वायत्त दर्जा जाहिर केला असून नुकतेच महाविद्यालयाला स्वायत्तता घोषित केल्याचे पत्र प्राप्त झालेले आहे़ यामुळे आता जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्याचे स्वातंत्र्य महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे.‘ज्ञानप्रसारो व्रतम’ हे ब्रीद वाक्य घेऊन १९४४ मध्ये स्थापन झालेल्या खान्देश कॉलेज एजुकेशन संस्थेने आपल्या कार्यकाळात अनेक विकासपर्व पाहिले आणि संस्थेची यशस्वी घोडदौड कायम राखत आपल्या सेवेचे पवित्र व्रत सुरु ठेवले आहे़ तसेच मुळजी जेठा महाविद्यालय प्रत्येक शैक्षणिक वर्षात आपले वेगळेपण जपणाऱ्या विशिष्ट कार्यपध्दतीद्वारे शैक्षणिक विकासाच्या मार्गावर नेहमीच अग्रस्थानी राहण्याचा प्रयत्न करत असते. गेल्या वर्षी महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता सिध्द करून नवीन मार्गदर्शक तत्वानुसार झालेल्या नॅक पुनर्मुल्यांकनामध्ये अव्वल स्थान प्राप्त केले होते़एवढेच नव्हे तर महाविद्याल्याने सलग तिसऱ्यावेळी नॅकची ‘अ’ श्रेणी प्राप्त केली होती़ सोबतच महाविद्यालयास कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स व त्यानंतर कॉलेज आॅफ एक्सलन्सचा दर्जा प्राप्त झाला़ त्यामुळे महाविद्यालयातील विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आले व त्याचा प्रत्यक्ष फायदा विद्यार्थ्यांना झाला.युजीसीकडून मु़जे़ महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे स्वत:चा अभ्यास तयार करता येणार आहे़ तसेच परीक्षा घेण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे़ विविध सर्टीफिकीट डिप्लोमा कोर्सेस सुरू करता येणार असून गुणपत्रिका तसेच डिग्री प्रमाणपत्रावर मु़जे़ महाविद्यालय व विद्यापीठ या दोघांचे नाव असेल़ महाविद्यालयावर नियायम मंडळ, विद्या परिषद, अभ्यास मंडळ, वित्त समिती आदींचे नियंत्रण असल्याने गुणवत्ता व पारदर्शी कारभार वाढणार आहे़ जागतिक दर्जाच्या प्राध्यापकांवर महाविद्यालयाच्या अभ्यास मंडळावर येता येणार आहे़ तसेच विद्यापीठात तीन वर्षात अभ्यासक्रम बदलला जात आहे़ आता मात्र तो बदलला पाहिजे याची आवश्यकता नसेल़ परिणामी निर्णय क्षमतेत गती येणार आहे़
मू़जे़ महाविद्यालयाला ‘स्वायत्त’ दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 2:12 PM
पाच तज्ञांच्या समिती आयोगाला दिला होता अहवाल असा असेल स्वायत्ततेचा फायदा
ठळक मुद्दे‘युजीसी’चे पत्र प्राप्त