जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाचे ठराव सहकार विभागाकडे येत आहेत. जिल्ह्यातून गेल्या तीन दिवसांत तब्बल ५७० ठराव आले आहेत. त्यात विविध कार्यकारी सोसायटीचे १८४ तर इतर संस्थांचे ३८६ ठराव आले आहेत. जानेवारी २०२० मध्येच ही ठरावाची प्रक्रिया राबवण्यात आली होती. जेव्हा ही प्रक्रिया थांबवली गेली तेव्हा एकूण ८५२ ठराव पाठवण्यात आले होते. त्यात ३९९ ठराव हे विविध कार्यकारी सोसायटींचे तर ४५३ ठराव इतर संस्थांकडून पाठवण्यात आले होते. यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नावाचा ठराव हा पाळधी विकासोतून पाठवण्यात आला आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक ही जून किंवा जुलैमध्ये होऊ शकते. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार ही निवडणूक पाचव्या टप्प्यात होणार आहे. सध्या या बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. रोहिणी खडसे - खेवलकर या काम पाहत आहेत.
सध्या माजी मंत्री एकनाथ खडसे, कोथळी, ता मुक्ताईनगर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, मनूर आणि बोदवड, खासदार उन्मेष पाटील दरेगाव, आमदार सुरेश भोळे कडगाव, ता. जळगाव, संचालक संजय पवार यांचा ठराव चांदसरमधून, माजी संचालक सोनल पवार,चोरगाव, माजी आमदार चिमणराव पाटील अंबापिंप्री, माजी खासदार वसंतराव मोरे मेहू-टेहू, अमोल पाटील, एरंडोल तालुका, माजी आमदार महेंद्रसिंग पाटील धारागीर, डॉ. सुरेश पाटील चहार्डी, ता. चोपडा, माजी आमदार स्मिता वाघ, मालपूर- धार आणि डांगर ता. अमळनेर येथून पाठवण्यात आला आहे.
बँकेच्या २१ संचालकांसाठी विविध कार्यकारी सोसायटीतून १५, इतर संस्था गटातून एक, दोन महिला, एक ओबीसी, एक एससी, एसटी आणि एक एन.टी असे संचालक निवडले जातात.
बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. वसंतराव मोरे, माजी आमदार चिमणराव पाटील, माजी आमदार सतीश पाटील यांच्या कारकिर्दीत बँकेने शेतकऱ्यांना सर्वात जास्त वित्तपुरवठा केला. तसेच कर्ज प्रक्रियादेखील सुलभ करण्यात आली होती.