जळगाव : सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला गंधार कला मंडळातर्फे आयोजित स्री लेखिका या विषयावर अक्षरगप्पा कार्यक्रम शनिवारी उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमात विविध कविता व गीतांनी रंग भरले होते.
स्रियांनी लेखन क्षेत्रात आपला विशिष्ट ठसा उमटवला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विविध लेखिकांच्या साहित्य कृतींवर अक्षरगप्पा घेण्यात आल्या. सुरुवातीला आसावरी जोशी यांनी महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा प्रेरणादायी प्रवास असणारे काशीबाई कानिटकर लिखित पुस्तकावर भाष्य केले. त्यानंतर नील कुलकर्णी यांनी सुनंदा भावसार यांची शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा ही कविता, तर पालवी मांडे यांनी शकुंतला पाटील यांची मन्हा खान्देशनी माटी ही अहिराणी कविता सादर केली. भास्करराव चव्हाण यांनी बहिणाबाई चौधरी यांच्याबद्दल भाष्य केले. यानंतर अमृता कस्तुरे यांनी सुरेल आवाजात ‘वाटेवरून माझ्या गेलास तू प्रिया रे’ ही इंदिरा संत यांची रचना गायली.
पुस्तकांमधून तीन पिढ्यांमधील अनोख्या भावबंधाची ओळख
सुचेता नेवे यांनी पुस्तकांमधून तीन पिढ्यांमधील अनोख्या भावबंधाची ओळख करून देणाऱ्या सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या पुस्तकाविषयी माहिती दिली, तर मानिनी तपकिरे यांनी शांता शेळके यांची नववर्षानिमित्त लिहिलेली ‘गत सालाचे स्मरण जागता, दाटून येते मनामध्ये भय’ ही कविता सादर केली. सूत्रसंचालन विशाखा देशमुख यांनी केले. अक्षरगप्पामध्ये विलास देशमुख, रती कुलकर्णी अर्चना मांडे यासह अनेक साहित्यिक व संगीतप्रेमी उपस्थित होते.