मी विचार करत बसलो होतो, आणि दारातून ढाण्या आवाजात गर्जना झाली, ‘ए ऽऽऽ स्तंभ्या, आत येऊ का?’ इतक्या उद्धट, उर्मट स्वरात माझ्यावर दादागिरी करणारा कोण असणार, हे सांगायची आवश्यकता भासू नये. त्या महापुरुषाला मी म्हणालो, ‘नान्या, इतकं सभ्य बनू नकोस. तुला शोभेलशा असंस्कृत माणसासारखा सरळ आत ये.’माझ्या व्यक्तिमत्त्वात आणि कुठल्याही खांबामध्ये, म्हणजे वेरुळ, अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये दिसणाऱ्या कोरीव स्तंभांपासून तर प्राथमिक शाळेतील एक इंची नळाच्या ध्वजस्तंभापर्यंत कोणत्याही स्तंभात काहीही साम्य मला तरी जाणवलेलं नाही. तरीही पृथ्वीच्या पाठीवर दोन व्यक्ती अशा आहेत की ज्यांना माझ्यात आणि स्तंभात अजोड साम्य दिसलं. एक म्हणजे माझे प्राथमिक शाळेतील गुरुजी आणि दुसरा हा नाना. प्रश्नोत्तराच्या तासाला गुरुजी जेव्हा प्रश्न विचारायचे त्यावेळी मला हमखास उभे राहण्याची शिक्षा मिळायची. हातातली छडी नाचवत गुरुजी खेकसायचे, ‘अरे बोल की, असा काय उभा आहेस मुखस्तंभासारखा.’ मुखस्तंभ कसा असतो, कसा दिसतो, कसा उभा राहतो, हे मला आजवर पाहायला मिळालेलं नाही. मग मी मुखस्तंभासारखा कसा उभा राहीन बरं. माझं मौन पाहून गुरुजी आज्ञा सोडायचे, ‘ह्या मुखस्तंभाला माझ्याकडे घेऊन या.’ एरवी गुरुआज्ञेशी घेणं देणं नसलेले दोन तीन धटिंगण पोरं गुरुआज्ञा शिरसावंद्य मानून मला ओढत त्यांच्यासमोर नेऊन टाकत. त्यावेळी माझी अवस्था वधस्तंभाकडे नेल्या जाणाºया फाशीच्या कैद्यासारखी झालेली असायची. यसरा हा नाना. माझ्यासारख्या विश्वविख्यात... छे.. छे.. ब्रह्मांडविख्यात लेखकाला ‘स्तंभ्या’, म्हणतो, शोभतं का त्याला? पण ह्यावर त्याचं म्हणणं असं की, ‘तुझ्यासारख्या वर्तमानपत्रात स्तंभ खरडणाºयाला ‘स्तंभ्या’ नाही म्हणायचं तर काय शेक्स्पीयर म्हणायचं की कालीदास? स्वत:ची इज्जत आणखी जाऊ नये म्हणून मी नमतं घेत म्हणालो, ‘म्हण बाबा, तुला जे म्हणायचं ते म्हण. पण लक्षात घे, स्तंभलेखन करायलाही प्रतिभा लागते. आठवड्याच्या आवठड्याला नवनवे विषय शोधून काढायचे, ते त्यात पुरेसे पाणी घालून ते अर्धशिक्षित पानटपरीवाल्यापासून तर जिल्हाधिकाºयापर्यंत सर्वांना एकाचवेळी पचतील इतपत पचनशील करून शिजवायचे, हे काम सोपं नसतं. पण ऐकेल तो नाना कसला. तो म्हणाला, ‘स्तंभ्या, प्रत्येक सोपी गोष्ट कठीण करून ठेवायची तुला सवयच आहे. माझ्या ओळखीचे एक नामवंत कवी होते, त्यांनी कधीही गद्य लेखन केलेलं नव्हतं. त्यांना स्तंभलेखनाचं निमंत्रण आलं आणि ते त्यांनी लगेच सहर्ष स्वीकारलं. मी म्हटलं, ‘सर, तुम्हाला हे कसं जमेल?’ त्यावर त्यांनी त्याचं गुपीत सांगितलं. स्तंभलेखन करून, गाजावाजासह त्याचं पुस्तकही प्रकाशित केलं. आहेस कुठे? नानाने त्या यशस्वी स्तंभलेखकाचं वर्णन केलं. ते असं.-सदरात धुंद राही हा स्तंभ लेखवाला,दंभात गुंग राही हा, स्तंभ लेखवाला.शंका कुणा न येता, जवळील कणभराचे,मणभर करोनी दावी, हा स्तंभ लेखवाला.मागील दैनिकांच्या जमवून कात्रणांना,लेखा नवीन सजवी, हा स्तंभ लेखवाला.मुद्दा काही असू द्या, निमित्त कोणतेही,उधळी फुले स्वमाथी, हा स्तंभ लेखवाला.थोरांवरील अपुल्या लेखातुनी खुबीने,करी जाहिरात अपुली, हा स्तंभ लेखवाला.खांद्यावरी तयांच्या ठेवून हात बोले,‘जीना’ असो की ‘गांधी’ हा स्तंभ लेखवाला.शोपेमधील काडी दाती दडून टोचे,बोचे तसाच लेखी, हा स्तंभ लेखवाला.मी म्हटलं, हे असं मला नाही जमणार. स्वत:चं काही सांगायचं नसलं तर लिहायचंच कशाला? यावर तो म्हणाला, अरे मग सामाजिक, राजकीय विषयांवर लिही की. मी म्हणालो, नकोरे बाबा, वाचकांच्या अस्मिता आता इतक्या नाजुक झाल्या आहेत की त्या कशाने दुखावतील काही सांगता यायचं नाही. लेखाच्या नावासोबत त्याचा पत्ता छापत नाहीत, म्हणून बरं आहे. नाहीतर स्तंभलेखकावर कोणान्कोणाकडून तरी हाडं मोडून घ्यायची वेळ येईल. यावर नाना चिडून म्हणाला, ‘माझ्यासारख्या समंजस, सहिष्णू वाचकाच्या भावना दुखावल्या आहेत. तुझ्या ह्या विधानाने मी हे मुळीच खपवून घेणार नाही. शब्द मागे घे नाही तर...’ म्हणत नाना शर्टाच्या बाह्या मागे सारत हिंस्त्र नजरेने माझ्यावर चालून येऊ लागला.-प्रा.अनिल सोनार, धुळे
स्तंभ आणि मुखस्तंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 1:31 AM