भुसावळ : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने कोम्बिंग ऑपरेशन करताना सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, काही गोवंश जनावरांची सुटका केली. तसेच १४ जणांकडे गोवंश आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना याबाबत स्पष्टता करावी, यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत.
नियमाच्या चौकटीव्यतिरिक्त कुठलेही नियमबाह्य काम होणार नाही, या उद्देशातून पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रात्री गौसिया नगर, मिल्लात नगर, जाम मोहल्ला या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. यामध्ये सात जणांकडे गोवंश जनावरे संशयितरीत्या आढळून आली.
याप्रकरणी हवालदार श्रीकृष्ण देशमुख यांनी फिर्याद दिली. त्यावरून सैय्यद निहाल सैय्यद जहिर (३७), चांद शहा हुसेन शहा (४८), मोहम्मद आबीद अब्दुल सत्तार (४२), मुसा फकिरा पिंजारी (५०), अल्लाउद्दीन शेख शेरोदिन (४३), आरिफ खान शकीयार खान (४२), शेख रफिक शेख कालू (५०) या सर्व गौसिया नगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय २१ गोवंश जनावरे १४ जणांकडे संशयितरीत्या आढळून आल्याने त्यांच्या मालकांना नोटीस देण्यात आली असून, ईदच्या नंतरही जनावरे तपासली जातील.
पोलिसांची तीन पथके
कोम्बिंग ऑपरेशनसाठी पोलीस प्रशासनाकडून तीन पथके तयार करण्यात आली होती. वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, एपीआय अनिल मोरे, मंगेश गोंठला, गणेश धुमाळ याशिवाय बाजारपेठ पोलीस ठाण्यातील डीबी पथक आरसीपी प्लाटूनचाही यात समावेश होता.