लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उन्हाळी सत्रातील माहे मे, जून, जुलै २०२१ मध्ये होणाऱ्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी परीक्षा अर्ज सादर करण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पदवीसाठी १८ मे तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी अर्ज सादर करण्यास २२ मे अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. तसे वेळापत्रक विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
विद्यापीठ संलग्नित महाविद्यालय, परिसंस्था तसेच विद्यापीठ प्रशाळा व विभागात विविध विद्याशाखांतर्गत शिकविल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या मे, जून आणि जुलै महिन्यात होणाऱ्या विविध परीक्षांचे अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी १२ मे, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी १७ मेपर्यंत अर्ज सादर करण्यास विद्यार्थ्यांना कळविले होते.
अर्ज भरण्यास अडचणी
विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावयाचा आहे. त्यामुळे खान्देशातील बहुतांश भागांमध्ये नेटवर्कची अडचण निर्माण होते तर काही विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन सुविधा नाही. अशा विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास विलंब होत होता. त्यामुळे परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस व अभाविपकडूनदेखील विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आली होती.
अन् विद्यापीठाने काढले नवीन पत्रक
विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता, विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली. याबाबत १२ मे रोजी पत्र काढण्यात आले आहे. त्यानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी १८ मेपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येणार आहे, तर २२ ताखेपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येईल. त्याचबरोबर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी २२ मे ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे तर २७ मेपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज सादर करता येणार आहे.
समन्वयकांची नियुक्ती करावी...
विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे अर्ज सादर करते वेळी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण उद्भवू नये तसेच अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने परीक्षा समन्वयकाची नियुक्ती करावी, अशा सूचना विद्यापीठाने केल्या आहेत. परीक्षा समन्वयकाचे नाव, मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी, ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याकरिता महाविद्यालयाचे बँक डिटेल्स, अकाउण्ट नंबर, आयएफएससी कोड इत्यादी बाबी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध कराव्यात. विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निराकरण ज्या त्या महाविद्यालयाने त्यांच्या स्तरावर करावे. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच विद्यापीठाचे मार्गदर्शन घ्यावे, असेही कळविण्यात आले आहे.