जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून न्यायालयाचे नियमित कामकाज बंद झाले होते़ आता आठ महिन्यांच्या कालावधीनंतर मंगळवारपासून न्यायालयाच्या नियमित कामकाजाला सुरूवात झाली आहे.
मंगळवारी वकील कक्ष उघडण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग बंधनकार करण्यात आले असून न्यायालयीन कामकाज हे दोन सत्रात होणार आहे. पहिले सत्र सकाळी ११ ते दुपारी १.३० तर दुसरे सत्र दुपारी २ ते ४.३० असेल. त्याचबरोबर पहिल्या सत्रामध्ये पुराव्यास नेमलेल्या केसेस राहतील. तर दुसऱ्या सत्रात निकाल, आदेश व युक्तीवाद ऐकणे आदी केसेस घेतल्या जाणार आहे.दरम्यान, नियमित कामकाजाला सुरूवात झाली असल्यामुळे वकील वर्गात नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे. परंतु, कोरोना संसर्ग अजूनही कायम असल्यामुळे वकील बांधवांनी मास्क लावणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा वकील संघाच्या सर्व सदस्यांकडून करण्यात आले आहे.