भुसावळ : जल जीवन मिशन योजनेंतर्गत साकेगाव येथे आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत गावात पाणीपुरवठा कामासाठी आधुनिक पद्धतीने सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. साकेगाव येथे जल जीवन मिशन योजना उत्कृष्टरीत्या राबवून राज्यात मॉडेल ठरेल, असा विश्वास आमदार सावकारे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी त्यांचा व सर्व्हेअर पाटील यांचा ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, इं.गा.विद्यालयाचे चेअरमन दिलीपसिंग पाटील, प्रभारी सरपंच आनंद ठाकरे, सरपंच पती विष्णू सोनवणे, माणिक पाटील, बी.एल.जी. कंपनीचे सर्व्हेअर अभियंता जगतराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल सपकाळे, पप्पू राजपूत, कुंदन कोळी, सागर सोनवाल, गणेश कोळी, अशोक सोनवणे, ग्रामविकास अधिकारी आदींची उपस्थिती होती.
स्मार्ट व्हिलेज साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने संपूर्ण पाइपलाइन व जलकुंभ जीर्ण असल्याचे आमदार संजय सावकारे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, त्यांनी तत्काळ स्मार्ट व्हिलेज साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाची जल जीवन मिशनअंतर्गत निवड करून, कोट्यवधी रुपये योजनेंतर्गत मंजूर करून घेतले. सर्वेक्षण व इस्टिमेट नाशिक येथील बीएलजी कंपनीला देण्यात आलेले असून, १५ जुलै रोजी कंपनीचे सर्व्हेअर अभियंता जगतराव पाटील हे आपल्या टीमसह ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित झाले. आमदार सावकारे यांनी स्वतः सर्वेक्षण ठिकाणी पाहणी करून इंजिनीयर पाटील यांना संपूर्ण गावात योग्य त्या ठिकाणी पाण्याचे जलकुंभ, तसेच ऑटोमेटिक व्हॉल्व सीस्टम, संपूर्ण साकेगाव परिसरात नवीन पाइपलाइन टाकण्याची सूचना दिली. पाण्याच्या दोन टाक्यांपैकी एक नवोदय विद्यालयाच्या मागील बाजूस, तसेच एक जॉली पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस एक अशा दोन पाण्याच्या टाक्या व नवीन कॉलनीदरम्यान नवीन पाइपलाइन निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, गावात भवानीनगर, बालुमिया परिसर व चुडामणनगर आदी तीन ठिकाणी जलकुंभ उभारणे, त्याचबरोबर २ विहिरी, ४ ट्युबवेल आदींवर वीजबचत व्हावी, यासाठी योजनेच्या इस्टिमेटमध्ये सोलर पॅनल असे सर्वसमावेशक अपेक्षा प्रभारी सरपंच ठाकरे व समस्त ग्रामपंचायत सदस्य यांनी सर्वेक्षण दरम्यान अपेक्षित असल्याचे सर्व्हेअर इंजिनीयर जगतराव पाटील यांना सांगितले. या योजनेमुळे गावासह शहरालगत असलेला अतिरिक्त परिसर पूर्णपणे जलमय होणार असून, भविष्यात पुढील शंभर वर्षे पाण्याची अडचण भासणार नाही. या संदर्भात सर्व्हेअंतर्गत नियोजन करण्याच्या सूचना आमदार संजय सावकारे यांनी केल्या.
फोटो कॅप्शन
जल मिशन योजनेंतर्गत गावात जलवाहिनी टाकण्यासाठी कामाच्या सर्वेक्षण प्रसंगी आमदार सावकारे यांच्यासह प्रभारी सरपंच आनंद ठाकरे, अनिल पाटील, दिलीप सिंह पाटील, माणिक पाटील व ग्रामपंचायत सदस्य.