लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाला आता वेग आला आहे. गुरुवारी सकाळपासूनच या ठिकाणी भुयारी मार्गासाठी खोदण्याचे काम सुरू करण्यात आले होते. येथे सकाळी ११ च्या सुमारास खोदकाम सुरू करण्यात आले. त्यानंतर बांधकाम करण्यात येणार आहे. प्रभात चौकातील उड्डाणपुलाच्या उतारावरच हा लहान भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. त्यातून कार, दुचाकींना येता जाता येणार आहे.
महामार्गावर नागरिकांच्या मागणीनुसार तसेच मु.जे. महाविद्यालय परिसरातून विद्यार्थ्यांना प्रवास करणे सुखकर व्हावे, म्हणून अग्रवाल चौकातदेखील महामार्ग ओलांडण्यासाठी एक भुयारी मार्ग करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी फार खर्च होणार नसल्याने हे काम आता हाती घेण्यात आले आहे. यात झांबरे विद्यालयाच्या मैदानाच्या संरक्षण भिंतीपासून काही अंतरावर समांतर रस्ता आहे. तेथून पुढे बहिणाबाई उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत हा भुयारी मार्ग असेल. त्यातून पायी, चारचाकी वाहने आणि दुचाकी वाहनांनी वाहतूक करता येऊ शकेल. त्यामुळे या परिसरातून महामार्ग ओलांडणाऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. या रस्त्याच्या कामाला गुरुवारी सुरुवात करण्यात आली.
चेंज ऑफ स्कोपमधून होतेय काम
प्रभात चौकातील उड्डाणपुलाच्या उतराच्या खालीच हा भुयारी मार्ग होणार आहे.
या परिसरात शाळा महाविद्यालये आहेत. तसेच हा चौक कायम वर्दळीचा असतो. असे असतानाही पहिल्या टप्प्यात त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र नंतर चेंज ऑफ स्कोपमधून उपलब्ध झालेल्या निधीतून रक्कम वापरून हा भुयारी मार्ग तयार केला जात आहे.
विद्युत कॉलनीतील लहान पुलाचे काम सुरू
विद्युत कॉलनी येथे लहान नाल्यावरील पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. पॉलिटेक्निकच्या भिंतीला लागून हा लहान नाला आहे. महामार्गावर त्याचा लहान पूल आधी होता. आता त्या ठिकाणी चौपदरीकरणासाठी नवा पूल बांधला जात आहे. त्याच्या दोन लेनचे काम पूर्ण झाले असून आता उरलेल्या दोन लेनचे काम करण्यात येत आहे.
भुयारी मार्गाखालील रस्ता केला खुला
गुजराल पेट्रोल पंपावर सुरू असलेल्या भुयारी मार्गावरील रस्ता खुला केला आहे. त्यामुळे निमखेडी रस्त्यावरून येणाऱ्या नागरिकांना पिंप्राळाकडे जाता येणार आहे. तसेच पिंप्राळ्याकडून जाणाऱ्या नागरिकांनादेखील शहराकडे येताना रस्ता ओलांडणे सोपे होणार आहे.