लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपातील भाजपच्या गटनेता नियुक्तीचा वाद आता मनपा आयुक्तांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विभागीय आयुक्तांनी भाजपचा अधिकृत गटनेता कोण ? ही निवड आयुक्तांनीच करायची असल्याचे सांगितल्याने आयुक्तांपुढे पेच निर्माण झाला आहे. मनपा आयुक्त याबाबत ठाम निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आयुक्तांकडून भाजपचा अधिकृत गटनेता कोण ? याबाबत निर्णय लवकर न घेतल्यास तोपर्यंत स्थायी समितीमधील नवीन सदस्यांची नियुक्ती, सभापतीपदाची निवडणूक देखील लागू शकणार नाही.
महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपच्या २७ नगरसेवकांनी भाजपच्या विरोधात मतदान केले होते. तर त्यानंतर भाजपचे ३ नगरसेवक पुन्हा बंडखोरांना जाऊन मिळाल्यानंतर बंडखोरांची संख्या ३० तर भाजपची २७ इतकी झाली आहे. या संख्येच्या जोरावर बंडखोर नगरसेवकांनी भाजपच्या गटनेतेपदी ॲड.दिलीप पोकळे यांची निवड केली होती; मात्र भाजपकडून अधिकृत गटनेते हे भगत बालाणी हेच असल्याचे सांगण्यात आले. याबाबत महापौरांनी ॲड.पोकळे यांना भाजपचे गटनेतेपदाचे पत्र दिल्यानंतर मनपा आयुक्तांकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला; मात्र मनपा आयुक्तांनी यावर निर्णय न घेता विभागीय आयुक्तांकडे हा प्रस्ताव पाठवून दिला. त्यावर विभागीय आयुक्तांनी निर्णय देण्यास नकार दिला असून, याबाबत मनपा आयुक्तांनी निर्णय घ्यावा अशा सूचना आयुक्तांना दिल्या आहेत.
आयुक्त द्विधा मनस्थितीत
मनपा आयुक्तांना याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ‘लोकमत’ ने वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र आयुक्तांकडून याबाबत कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. दरम्यान, मनपातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे अधिकृत गटनेते निवडीबाबत मनपा आयुक्त द्विधा मनस्थितीत असून, याबाबत निर्णय घेण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे मनपा आयुक्त हा निर्णय घेण्याचे टाळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच गेल्या आठवड्यात मनपा आयुक्त मुंबईला गेले असता याबाबत काही लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच बदलीबाबत देखील मनपा आयुक्तांनी शिफारस केल्याची चर्चा मनपात आहे.
कोट..
मनपा आयुक्तांनी कायद्याच्या आधारावर निर्णय घेणे अपेक्षित असून, भाजपचा अधिकृत गटनेता मीच आहे. आयुक्तांनी तत्काळ याबाबत निर्णय घेऊन स्थायी समितीची पुढील प्रक्रिया सुरु करावी. तसेच आयुक्तांनी चुकीचा निर्णय घेतल्यास त्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचीही तयारी आहे.
-भगत बालाणी, भाजप गटनेते
महापौरांनी निर्णय घेतल्यानंतर आयुक्तांनी देखील याबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते. आयुक्तांनी गटनेते नियुक्तीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्याची गरज नव्हती. विभागीय आयुक्तांनी आता याबाबत निर्णय घेण्यास नकार दिला असल्याने आयुक्तांनी कायद्याप्रमाणे अधिकृत गटनेत्याची नियुक्ती करण्याची गरज आहे.
-ॲड.दिलीप पोकळे, भाजप बंडखोर गटनेते