लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान संचलित ब.गो. शानभाग विद्यालयातील शालेय पोषण आहार योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी उपसंचालकांच्या आदेशानुसार बुधवारी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. याबाबत त्यांनी पत्र काढले आहे.
शालेय पोषण आहार योजना सुरू झाल्यापासून शानभाग विद्यालयाने या योजनेचा लाभ घेतला आहे. पुरवठादाराकडून पुरविण्यात आलेले धान्यादी माल सुध्दा स्वीकारले आहे. पण, गेल्या दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिजवून अन्न दिलेले नाही. या आहारापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवले आहे. एवढेच नव्हे तर शालेय पोषण आहाराचे रेकॉर्डसुध्दा बनावट असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ता रवींद्र शिंदे यांनी पुणे येथील शिक्षण संचालकांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन शालेय पोषण आहार उपसंचालक यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश नुकतेच दिले होते. त्यानुसार बुधवारी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे.
यांचा आहे समावेश
चौकशी समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी विकास एम.पाटील (पंचायत समिती, पाचोरा), शापोआ लेखा अधिकारी श्यामकांत एच. नाहळदे (प्राथमिक शिक्षण विभाग) तसेच शापोआ अधीक्षक अजित तडवी (पंचायत समिती, रावेर) यांचा समावेश आहे. संपूर्ण चौकशी अहवाल हा शिक्षण विभागाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर तो अहवाल पुणे उपसंचालकांकडे पाठविण्यात येईल.