लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वैजनाथ ता.एरंडोल येथील वाळू गटातून क्षमतेपेक्षा अधिक उपसा होत असल्याची तक्रार ॲड.विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या तक्रारीवर जिल्हा प्रशासनाने महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत आठ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती २८ मे रोजी या वाळु गटांची मोजणी करणार आहे.
हा ठेका १ हजार ४२८ ब्रास वाळू उपशासाठी होता. तेथे क्षमतेपेक्षा जास्त उपसा होत असून महसूल बुडत असल्याची तक्रार अॅड. विजय भास्कर पाटील यांनी २१ मे रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली होती. त्यानंतर ही आठ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
लिलावात मंजूर खोलीपेक्षा जास्त उत्खनन झाले आहे का? पर्यावरण विषयक अटींचे पालन केले आहे का? मंजूर वाळूसाठ्यापेक्षा जास्त वाळू उपसा आणि उत्खनन झाले आहे का? या मुद्यांवर चौकशी केली जाणार आहे.