प्रशांत भदाणे
अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. 25 मार्चपर्यंत अधिवेशन आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री शेतकऱ्यांना एकरी, हेक्टरी किंवा ज्याप्रमाणे नुकसान झालं आहे त्या पद्धतीने नुकसान भरपाई देण्याची घोषणा करतील, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जळगावात दिलीये.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दुपारी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
कृषिमंत्री सत्तार पुढे म्हणाले की, दीड दिवसांच्या पाहणी दौऱ्यात मी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केलीये. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, कांद्याचे तर काही ठिकाणी भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यांमध्ये मका, गहू आणि हरभऱ्याचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, त्याची अंमलबजावणी युद्ध पातळीवर सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.
एकही शेतकरी वंचित राहणार नाही -
नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश शासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत. त्यानुसार युद्ध पातळीवर अंमलबजावणी सुरू आहे. एकही नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मी देतो, असंही त्यांनी सांगितलं.