अमित महाबळ
जळगाव : विद्यापीठात मुलींना भूत वगैरे काही दिसले नाही पण आजूबाजूच्या गावांतून येणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी अखेर कुलगुरूंकडे तक्रार करत बंदोबस्ताची मागणी केली आहे. ‘कुलगुरू-विद्यार्थी संवाद पर्वात’ शनिवारी, कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांची विद्यार्थिनींनी भेट घेऊन आपल्या अडचणी व समस्या मांडल्या.
नवीन शैक्षणिक वर्षातील कुलगुरू विद्यार्थी संवाद पर्वाचा प्रारंभ शनिवारी झाला. कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांच्या दालनात विद्यापीठ प्रशाळा आणि संलग्नित महाविद्यालयांमधील विविध आठ विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेतली. लेखी निवेदन देवून त्यांनी कुलगुरूंकडे आपल्या समस्या मांडल्या. यामध्ये सोयी-सुविधा, विद्यापीठ परिसरातील कुत्र्यांचा सुळसुळाट, रिड्रेसलचे निकाल लवकरात लवकर लागावेत आदी मुद्यांचा समावेश होता.
दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी कुलगुरू भेटणार
कुलगुरूंनी या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांच्या शंकाचे समाधान केले. यावेळी कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील हे उपस्थित होते. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी दुपारी २:३० वाजता विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत थेट कुलगुरूंची भेट घेवून आपल्या अडचणी कानावर घालता येणार आहेत.