वाकोद, ता. जामनेर, जि.जळगाव : ‘आपले सरकार पोर्टल’वरील ‘तक्रार तुमची, जबाबदारी आमची’ यावर वाकोदच्या विद्यार्थ्याने केलेल्या अवैध धंदेविरोधात एका आॅनलाइन गोपनीय तक्रारीने अख्खे पोलीस प्रशासन हादरल्याची माहीती पुढे आली होती. दरम्यान, तक्रारदारासच पोलिसांनी बसस्थानक परिसरात अवैध धंदेचालकांसमोर नेल्याने जीवितास धोका असल्याचे तक्रारदार विद्यार्थ्याचे म्हणणे आहे.विद्यार्थ्याने तक्रार दिल्यानंतरही वाकोद गावी चोरून अवैध धंदे सुरू आहेते. यावर नियंत्रण मिळविणे पहूर पोलिसांच्या बसमध्ये नसल्याचे दिसून येत आहे. पोर्टलवर थेट शासन दरबारी तक्रार करूनदेखील कोणतेच ठोस पाऊल पोलीस प्रशासन उचलत नसल्याने या सुज्ञ विद्यार्थ्याने राज्याच्या गृहराज्य मंत्र्यांकडेदेखील तक्रार केली आहे.विद्यार्थ्याने उपस्थित केलेले मुद्देवाकोद गावी आठ सट्टा पिढ्या, पत्त्याचे सहा क्लब, गावी गावठी दारू व बेकायदेशीर बिअर विकणाऱ्याची कमतरता नाही, पोलीस प्रशासनाला याची जाणीव करून द्यावी लागते की, त्यांना कल्पना असताना कारवाई का होत नाही, तक्रार केल्यास स्थानिक नेत्यांची दमदाटी असते, पोलीस अधीक्षकांनी गावी येवून चौकशी केल्यास येथील वस्तुस्थिती पाहून अचंबित होईल यात शंका नाही, आजही गावी अवैध धंदे सुरु असून पोलिसाना हे बंद करणे जमले जमले तर आम्ही पुढील तक्रार गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले.या प्रकरणात पूर्णत: गोपनीयता असताना गावी संबंधित तक्रारदारांचे नाव विचारपूूस करीत पहूर पोलीस कर्मचारी घरी पोहचले, मी घरी असताना मला वर्दळीचे ठिकाण असलेल्या बसस्थानक परिसरात बोलवून जबाब देण्यास सांगितले गेले. परंतु अवैध धंदे गावी सुरू असल्याने मी जबाब देण्यास नकार दिला होता. पण अवैध धंदेचालकांना आॅनलाइन तक्रार करणारा कोण हेच दाखविण्यासाठी मला पोलिसांनी येथे आणल्याचे माझ्या निदर्शनास आले. मला बघण्यासाठी याठिकाणी लक्षणीय गर्दी जमलेली होती. जबाब देण्यास नकार दिल्यानंतर गावाबाहेर असलेल्या एका हॉटेलवर बोलविण्यात आले. मी माझ्या मित्रासोबत येथे गेलो असता संबधित विभागाच्या कर्मचाºयांनी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. तू जबाबावर सही केली नाही तर तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करू, तुला अडकवू व वैयक्तिक दबाव आणला गेल्याने माझ्याकडे जबाबावर सही करण्यापलीकडे कोणताच पर्याय नव्हता. अवैध धंदेचालकांकडून मला माझ्या परिवाराला धोका असल्याचे असे या तक्रारीत म्हटले आहे.पोलिसांवर केलेला आरोप मूळात चुकीचा आहे, असा कोणताही प्रकार घडलेला नाही आम्ही. वाकोद गावी अवैध धंदे बंद केलेले असून, पूर्णपणे गावात लक्ष ठेवून आहे. चोरून लपून कोणी आढळून आल्यास किंवा कोणी सांगितल्यास अवैध धंदेचालकांवर कायदेशीर कारवाई करू. - मोहन बोरसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलीस ठाणे, पहूर, ता.जामनेरवाकोद गावातील विद्यार्थ्याने बोकाळलेल्या अवैध धंद्याबाबत आपले सरकार या पोर्टलवर गोपनीय तक्रार दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय स्थरावर तक्रारदार कोण हे समजते. मात्र तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. मात्र या प्रकरणामध्ये संबधित विद्यार्थ्याचे नाव उघड करण्याचे काम पोलीस विभागाकडून झाल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.आॅनलाइन तक्रारदार कोण हे गावात कळल्यानंतर अनेकांकडून खिल्ली उडविली जात आहे, मला सध्या ‘आॅनलाइन’ नावाने चिडविले जात आहे, रस्त्यावरून जात असताना ‘ओपन आला का?’, पत्ता कोठे चालू आहे, चांगली गावठी दारू कोणाकडे आहे. हे सर्व गोपनीय नाव उघड झाल्याने मला त्रास सह करावा लागत आहे, यापुढे तक्रार करावी की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. तसेच ही गोपनीय तक्रार उघड करणाºया संबंधित अधिकारी यांची चौकशी करून कारवाईची मागणी या विद्यार्थ्याने केली आहे.पहिली आॅनलाइन तक्रार ४ एप्रिल २०१८ रोजी केल्यानंतर या विद्यार्थ्याने आजपर्यंत एकूण नऊ तक्रारी दिलेल्या आहेत. २६ जून २०१८ रोजी संबंधित तक्रारीबाबत पोलीस अधीक्षकांचे चौकशीसंदर्भात पत्र आले होते.
तक्रारदारासच पोलिसांनी नेले अवैध धंदेचालकांसमोरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 11:36 PM