लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : वडगाव टिघरे (ता. जामनेर) येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार दिल्याच्या कारणावरून दुकानदाराने तक्रारदारासह ४ ते ५ जणांना मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली. दुकानदाराने दिलेल्या तक्रारीवरून परस्परांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.
वडगाव टिघरे येथील मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. यात रस्त्यावर होत असलेली मारहाण व नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.
फिर्यादी अमृत दिनकर गव्हाळे यांनी दुकानदार हे लाभार्थींना कमी धान्याचा पुरवठा करतात, महिन्यातून फक्त दोनच दिवस दुकान सुरू ठेवतात, अशी तक्रार पुरवठा विभागाकडे केली होती, याचा राग आल्याने दुकानदार मधुकर ओंकार मोरे यांनी मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी मधुकर ओंकार मोरे, संजय रामधन मोरे, ईश्वर मधुकर मोरे, विजय रामधन मोरे, रामधन राजाराम मोरे, श्रीराम राजाराम मोरे, अंजना मधुकर मोरे, युवराज रामधन मोरे, दीपक पुंडलिक रक्षे (सर्व रा. वडगाव तिघरे, ता. जामनेर) यांच्या विरोधात भादंवि कलम ३२४, १४३, १४७, ३२३सह ५०४, ५०६ व अनुसूचित जाती-जमाती कायद्यानुसार ॲट्राॅसिटीचा गुन्हा नोंदविला आहे.
दुसरी फिर्याद विजय मधुकर मोरे यांनी दिली असून, त्यात म्हटले आहे की, पुरवठा विभागातील चौकशी कामातून परत येत असताना अमृत गव्हाळे यांनी सांगितले की, पैशाच्या जोरावर लोकांना विकत घेतात, या कारणावरून अमृत गव्हाळे, प्रकाश दिनकर गव्हाळे, दिनकर हिरामण गव्हाळे, सुशीला दिनकर गव्हाळे, कविता अमृत गव्हाळे, कल्पना प्रकाश गव्हाळे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६, ३९५ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
उपविभागीय अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, हवालदार जयसिंग राठोड तपास करीत आहेत.